बंगळुरू : कर्नाटकात डेंग्यूने कहर केला असून राज्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आतापर्यंत राज्यात ९ हजार ८२ रुग्ण आढळले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत डेंग्यूचे एकूण ४२४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत ९०८२ रुग्णांची नोंद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डेंग्यूची लागण झालेल्या ११९ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नसून, यंदा डेंग्यूमुळे आतापर्यंत ७ जणांना जीव गमवावा लागला आहे. विभागाचा दावा आहे की १३ जुलै रोजी २ हजार ५५७ लोकांची चाचणी घेण्यात आली. त्यामुळे यावर्षी एकूण ६६ हजार २९८ जणांची चाचणी घेण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत शून्य ते एक वर्ष वयोगटातील ४ बालके डेंग्यूने ग्रस्त असल्याचे या सरकारी अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्याच वेळी, १ ते १८ वर्षे वयोगटातील रुग्णांची संख्या १६८ आहे. १८ वर्षांवरील रुग्णांची संख्या २५२ असून, २४ तासांत एकूण ४२४ नवीन रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने राज्यभर डेंग्यू वॉर रूम उभारल्या आहेत.