पुणे : पुण्यातील येरवड्यातील कारागृहातून पळालेला कैदी आशिष जाधव हा स्वत:चं परतला आहे. त्याच्या आईवडिलांनीच त्याला कारागृहात परत आणूण सोडले आहे. आईला हृदयविकाराचा झटका आल्याने तिला भेटण्यासाठी आशिष याने पळ काढला असल्याची माहिती परत आल्यानंतर त्याने दिली आहे. आशिष पळून गेल्यामुळे कारागृहात मोठी खळबळ उडाली होती. मात्र तो स्वत:च परत आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाचा आरोपी आशिष जाधव याला येरवडा कारागृहातील रेशन विभागात नोकरी देण्यात आली होती. कारागृह प्रशासनाने सोमवारी दुपारी कैद्यांची मोजणी केली असता जाधव बेपत्ता असल्याचे आढळून आलं होतं. येरवडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून त्याला पकडण्यासाठी छापे टाकण्यात येत होते. मात्र तो स्वत:च परतला आहे.
जाधव खुल्या कारागृहातून पळून गेला होता. तो तुरुंगातून कसा पळून गेला याचा तपास सुरू करण्यात आला होता. जाधव यांच्याविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव हा कुख्यात गुन्हेगार आहे. पुण्यातील वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात २००८ मध्ये दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हापासून तो येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला कारागृहातील रेशन विभागात नोकरी देण्यात आली होती.
आशिष जाधव याने आईच्या काळजीपोटी पलायन केल्याचं समोर आले आहे. त्याच्या आईला काही दिवसांपूर्वी ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्याला त्यांच्या आईची काळजी वाटत होती. त्यामुळे आईची भेट घेण्यासाठी थेट कारागृहातून पळ काढण्याचा निर्णय घेतला होता.