छ. संभाजीनगर : सध्या सोशल मीडियावर रिल्स बनवून प्रसिद्ध होणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. काहीतरी स्टंट किंवा हुल्लडबाजी करुन प्रसिद्ध होण्याचे फॅड वाढत असून असाच एक स्टंट तरूणांना चांगलाच भोवला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर हातात पिस्तूल घेत १०-१२ तरुणांना रील करण्याचा प्रताप त्यांना चांगलाच भोवला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे मनात भीती आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ जणांना पोलिसांनी अटक केली असून इतरांचा शोध सुरु आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तरुणांनी केलेला हा प्रकार अतिशय गंभीर असून या तरुणांवर दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख हमीद शेख हबीब, शेख आफताब शेख कादर , शेख अशपाक आदिल तंबोली ऐजाज, सुमित सुभाष आवलकर अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.
समृद्धी महामार्गावर पसरवली दहशत
दक्षिण भारतीय चित्रपटांमधल्या दृश्यांप्रमाणे हातात पिस्तूल घेऊन दहा-बारा तरुणांनी झूंडीत चालत येत समृद्धी महामार्गावर रील शूट करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. दौलताबाद शिवारातील समृद्धी महामार्गावर बनवण्यात आली आहे. रीलच्या नादात समाज माध्यमांमधून सामान्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचे प्रयत्न कधी थांबणार असा सवाल उपस्थित होत आहे.