सोलापूर : मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या ‘मुख्यंमत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे ऑनलाईन अर्ज भरताना नारीशक्ती अॅपवर महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये फोटो अपलोड केल्यावर फोटो अपलोड न होता अॅपमधून थेट बाहेर पडतो. वैतागलेल्या महिला महा-ई-सेवा केंद्राचा आधार अर्ज भरण्यासाठी घेत आहेत. याठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणी’ची सरासरी लूट केली जात आहे. एक अर्ज दाखल करण्यासाठी १०० ते १५० रुपये घेत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘मुख्यंमत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज नारीशक्ती अॅपवर भरताना अॅप लवकर ओपन होत नाही. सर्व्हर डाऊन असते. कागदपत्रे अपलोड करण्यास वेळ लागत आहे. अनेक वेळा प्रयत्न करुन अर्ज सबमिट होत नाही. शेवट्या टप्प्यात ऑनलाईन फोटो दाखल केल्यानंतर अॅपमधून बाहेर फेकला जातो. पुन्हा पहिल्यापासून माहिती भरावी लागत आहे. त्यामुळे वैतागलेल्या महिला महा-ई-सेवा केंद्राचा आधार घेत आहेत. महा-ई-सेवा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा हे महा-ई-सेवा केंद्रचालक घेत आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी शंभर ते दीडशे रुपयांची आकारणी केली जात आहे. वास्तविक पाहता अर्ज दाखल करण्यासाठी कोणतीही शुल्क घेऊ नये असे राज्य शासनाचे तसेच जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत. असे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत. सोलापुरात एका महा-ई-सेवा केंद्रचालकावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करत परवाना रद्द केला आहे.
तरीदेखील मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडकी बहिणी’ची लूट चालू आहे. एक अर्ज दाखल करण्यासाठी शंभर ते दीडशे रुपये घेण्याचा महा-ई-सेवा केंद्रचालकांचा धंदा बिनभोवाटपणे चालू आहे. महिन्याकाठी मिळणाऱ्या एक हजार पाचशे रुपयांसाठी महिला मागेपुढे न पाहता लवकर अर्ज सबमिट होण्यासाठी कोणतीही तक्रार न करता पैसे देत आहे.
ही योजना महायुतीच्या सरकारची असली तरी आजी-माजी नगरसेवकांसह भावी नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणी’च्या मदतीला धावत आहेत. शिबिराच्या माध्यमातून अॅनलाईन अर्ज भरून दिले जात आहेत. याठिकाणीदेखील महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या बहिणींची लूट करणाऱ्या महा-ई-सेवा केंद्रांची जिल्हा प्रशासनाकडून अचानक तपासणी करावी. भरारी पथकांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
पैसे घेण्याचा उद्योग सर्वच महा-ई-सेवा केंद्रांवर चालला आहे. मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष अर्ज भरण्यासाठी गर्दी करत असल्याने या गर्दीचा फायदा घेतला जात आहे. अर्ज तुमचा सबमिट नाही झाला, तर पैसे परत देण्याचे आमिषदेखील महा-ई-सेवा केंद्रचालकांडून दाखवले जात आहे. या प्रकरणाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन महिलांची आर्थिक लूट थांबवण्याची मागणी होत आहे.