नवी दिल्ली : बेंगळुरूमध्ये तुरुंगात बंद असणारा सुकेश चंद्रशेखर याच्या महागड्या वाहनांचा आयकर विभाग पुढील आठवड्यात लिलाव करणार आहे. सुकेशकडून अनेक संस्थांची थकबाकी वसूल करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात येत आहे. येत्या २८ नोव्हेंबर रोजी सुकेशच्या ११ महागड्या गाड्यांचा लिलाव होणार आहे. यामध्ये एका दुचाकीचाही समावेश आहे.
लिलावासाठी सादर होणाऱ्या कारमध्ये बीएमडब्लू, टोयोटा, रेंज रोव्हर, लॅम्बॉरगीनी, जैगुआर, रोल्स रॉयस, बेंटली, इंनोवा, फॉर्च्युनर, निसान टीना आणि पोर्श यांचा समावेश आहे. या ११ गाड्यांव्यतिरिक्त, आयटी विभाग त्याच्या (सुकेशच्या) स्पोर्ट्स क्रूझर बाईक डुकाटी डायवेलचाही लिलाव करेल.
केरळ आणि तामिळनाडूसह देशाच्या विविध भागातून जप्त करण्यात आलेल्या या वाहनांचा विभागाकडून ऑनलाइन लिलाव करण्यात येणार आहे. सध्या विभागाकडून ‘सुस्थितीत’ असल्याचे वर्णन केलेली ही वाहने शुक्रवारी मध्यवर्ती महसूल भवनात तपासणीसाठी ठेवण्यात आली आहेत. चंद्रशेखर याच्याकडे विविध सरकारी संस्थांचे ३०८.४८ कोटी रुपये थकीत आहेत.
सुकेशची ही वाहने २०१८ साली प्राप्तिकर विभागाने केरळ आणि तामिळनाडूसह देशाच्या विविध भागांतून जप्त केली होती. त्याच्याकडे विविध सरकारी संस्थांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे, त्यामुळे या महागड्या वाहनांच्या लिलावाद्वारे थकबाकी वसूल करण्याचा निर्णय घेतला.