25.1 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeलातूरविठ्ठल नामाने दुमदुमली लातूरनगरी

विठ्ठल नामाने दुमदुमली लातूरनगरी

लातूर : प्रतिनिधी 
अवघे गर्जे पंढरपूर!
चालला नामाचा गजर !!
अशा संतोक्तीची प्रचिती देत तीर्थक्षेत्र पंढरपुरच्या आषाढी वारी सोहळ्यानिमित्त दि. १७ जुलै रोजी विठ्ठलनामाने लातूरनगरी दुमदुमून गेली. भक्तीमय वातावरणात आणि प्रचंड उत्साहात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शहरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदीरामध्ये दर्शनासाठी गर्दी होती तर लक्षवेधी आषाढी दिंड्यांनी उत्साहाला आणखी उधान आले.
येथील नवीन रेणापूर नाक्यावरील पु. अहिल्यादेवी होळकर चौकातील श्री विठ्ठल मंदीरात दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदीराच्या परिसरही  गर्दीने फुलून गेले होते. मंदीर  परिसरात व्यापा-यांनी  दुकाने थाटली होती. अतिश्य सुंदर मांडणी, आकर्षक सजावट, प्रसाद, कुंकू, बुक्का, उदबत्ती, तुळशीच्या माळा, गोपीचंदन, टाळ, मृदंग, वीणा, तबला, बांगड्या, देवाचे फोटो, आध्यात्मिक ग्रंथ, चुरमुरे, पेढे आदींची दुकाने मोठ्या प्रमाणात होती. या ठिकाणी खरेदीसाठी भाविकांची लगबग दिसून येत होती.
शहरातील विविध शाळांमधील चिमुकल्यांच्या दिंड्या निघाल्या. पावसाची रिमझीम आणि विठ्ठलनामाचा गजर यामुळे भाविकांचा उत्साह दुणावला.  विठुरायाच्या नावाने  १११ वृक्षांची लागवड  लातूर पासून जवळच असलेल्या १२ नंबर पाटी येथील हवा मल्लिनाथ महाराज मठ संस्थान परिसरात आषाढी एकादशी निमित्त लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठानने १११ वृक्षांची लागवड केली. ही झाडे विठुरायाच्या नावाने लावण्यात आली असून, संवर्धनाची जबाबदारी मठ संस्थानने घेतली आहे. आषाढी एकादशी दिवशी सकाळी ७ ते ११ यावेळेत वसुंधरा टीमने श्रमदान करून वृक्षारोपण केले. वृक्षारोपण दरम्यान वरुणराजाने हजेरी लावली त्यामुळे उत्साह आणखी वाढला.
वसुंधरा प्रतिष्ठानचे वृक्ष लागवड आणि संवर्धन अभियान प्रमुख राहुल माशाळकर आणि सदस्य वैभव वाघ यांनी आपला वाढदिवस अनावश्यक खर्च टाळून १११ रोपांची लागवड विठुरायाच्या नावाने केली. बुधवारी सकाळी चार तास वसुंधरा टीमने श्रमदान केले. खड्डे करणे, आळे करणे, पाणी देणे, झाडांना सपोर्ट म्हणून काठ्या बांधणे आदी कामे करण्यात आली. या उपक्रमात मठ संस्थानचे गोंिवद जाधव महाराज यांच्यासह वसुंधरा टीमचे प्रा. योगेश शर्मा, रामेश्वर बावळे, अमोल स्वामी, अ‍ॅड. डॉ. अजित चिखलीकर, राहुल माशाळकर, वैभव वाघ, विलास धावारे, प्रशांत मसलगे, हनुमंत माने, अर्जुन सूर्यवंशी, भीमाशंकर पवार आदींनी पुढाकार घेतला.
वाढदिवस म्हणलं की सेलिब्रेशन आलंच. याचे खास आकर्षण तरुणाईमध्ये दिसते. मात्र, आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून वसुंधरा प्रतिष्ठानचे राहुल माशाळकर आणि सदस्य वैभव वाघ यांनी १११ वृक्षांची लागवड करून आदर्श निर्माण केला. प्रत्येकाने काळाची गरज ओळखून स्वत:च्या वाढदिवसाला वृक्षारोपण अन् संवर्धन करण्याची आज ख-या अर्थाने गरज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR