इंदूर : मध्य प्रदेशातील २३० सदस्यीय विधानसभेसाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले आहे. या निवडणुकीत २,५३३ उमेदवार रिंगणात होते. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार मतदानाच्या एकाच टप्प्यात ७६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातील उमेदवारांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाला उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात, १८० आमदारांनी २०१८-२०२३ मध्ये त्यांच्या मालमत्तेत १ ते १,१९२ टक्क्यांपर्यंत वाढ दर्शवली आहे, तर इतर १२ आमदारांनी त्यांच्या मालमत्तेत १ ते ६४ टक्क्यांपर्यंत घट दर्शवली आहे.
मनवर (एसटी) मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार डॉ. हिरालाल अलवा यांच्या मालमत्तेत १९८२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जे यादीत सर्वात वर आहेत. तर सबलागढचे दुसरे काँग्रेस आमदार बैजनाथ कुशवाह यांच्या मालमत्तेत सर्वाधिक ६४ टक्के घट नोंदवली गेली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे (भाजप) रतलाम शहराचे प्रतिनिधित्व करणारे चेतन्या कश्यप हे राज्यातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. त्यांची संपत्ती २०१८ मध्ये 204 कोटी रुपयांवरून २०२३ मध्ये 296 कोटी रुपयांपर्यंत वाढली, त्यात ९१.४ कोटी रुपयांची वाढ झाली. याउलट, रायगाव येथील काँग्रेस आमदार कल्पना वर्मा यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती आहे.
आमदारांमधील संपत्तीतील असमानताही धक्कादायक आढळून आली आहे. शीर्ष १० सर्वात श्रीमंत आमदारांची एकत्रित संपत्ती १,७२८.५२ कोटी रुपये होती, जी इतर १८२ आमदारांच्या एकत्रित संपत्तीच्या जवळपास आहे. इतर सर्व आमदारांची संपत्ती १,६९२ कोटी रुपयांची आहे. ही विषमता विधान मंडळातील व्यापक आर्थिक फरक अधोरेखित करते.
पुन्हा निवडणूक लढवणाऱ्या सर्व १९२ आमदारांच्या संपत्तीची बेरीज ३,५०७.३४ कोटी रुपये आहे. एकूण रकमेपैकी सर्वात जुना पक्ष काँग्रेसचा वाटा ५२.८१ टक्के आहे. त्यानंतर भाजपचा क्रमांक लागतो ज्यांच्या उमेदवारांकडे ४६.०५ टक्के मालमत्ता आहे आणि इतरांकडे ३.५८ टक्के मालमत्ता आहे. ही आकडेवारी राज्याच्या राजकीय परिस्थितीत या दोन प्रमुख पक्षांचे आर्थिक वर्चस्व अधोरेखित करते.