नवी दिल्ली : यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. वैयक्तिक कारणास्तव सोनी यांनी अध्यक्षाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले.
विशेष म्हणजे त्यांनी आपला कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. वादग्रस्त परिविक्षाधिन अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामुळे सध्या सूपीएससीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात असतानाच सोनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
२०२९ मध्ये मनोजकुमार सोनी यांचा कार्यकाळ संपणार होता मात्र कार्यकाळ संपायच्या आधीच त्यांनी राजीनामा दिला आहे. प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ मनोज सोनी यांनी १६ मे २०२३ रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्विकारला होता. दरम्यान त्यांना राजीनामा अद्याप मान्य करण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मनोज सोनी यांना सामाजिक आणि धार्मिक कार्यात काम करण्यासाठी अधिक वेळ द्यायचा आहे, असे बोलले जात आहे.कालच केंद्रीय लोकसेवा आयोगाने वादग्रस्त परिविक्षाधिन अधिकारी पूजा खेडकर यांना कारण दाखवा नोटीस बजावून त्यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. बनावट कागदपत्र दाखल करुन पूजा खेडकर यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.