पिंपरी : पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात दररोज अपघातांचे प्रमाण वाढत आहे. यात वेगातील कार, ट्रकच्या अपघातांचे प्रमाण वाढले असून शुक्रवारी सायंकाळी रावेत बीआरटी रस्त्यावर एका कारने १२ दुचाकींना धडक दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये वाहनचालक किरकोळ जखमी झाला असला तरी दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.
रावेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील एका गॅरेजमध्ये एक कार दुरुस्तीसाठी आली होती. कारचालकाने कार चालविताना येत असणा-या अडचणी मेकॅनिकला सांगितल्या. त्यानंतर नक्की काय अडचण तसेच बिघाड आहे हे पाहण्यासाठी कार घेऊन रावेत बीआरटी मार्गावर मेकॅनिक तपासणीसाठी गेला.
म्हस्के वस्ती येथे गेल्यानंतर अगोदरच नादुरुस्त असणा-या कारचे ब्रेक लॉक झाले. त्यामुळे कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटला. कारने समोरील आणि आजूबाजूच्या दुचाकींना धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार दुचाकीसह रस्त्यावर पडले.