सोनीपत : हरियाणातील सोनीपतमधील काँग्रेसचे आमदार सुरेंद्र पनवार यांना ईडीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांना अंबाला न्यायालयात हजर करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, अवैध उत्खनन प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ४ जून रोजी ईडीने सुरेंद्र पनवार यांच्या घरावर छापा टाकून तपास केला होता. त्यावेळी ईडीच्या पथकाने त्यांच्या घरातून अनेक कागदपत्रे ताब्यात घेतली होती.
दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी या कारवाईला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. ४ जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यमुनानगरचे माजी आमदार दिलबाग सिंग आणि सोनीपतचे काँग्रेसचे आमदार सुरेंद्र पनवार यांची खाण प्रकरणात चौकशी केली आणि त्यांच्या ठिकाणच्या नोंदींचा शोध घेतला.
या प्रकरणाशी संबंधित पुरावे देण्यासाठी शुक्रवारी आमदारांना बोलावण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तेथील न्यायालयाबाहेरून त्यांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर टीमने त्यांना सोनीपत येथील त्यांच्या निवासस्थानी आणले आणि नंतर अंबाला येथे नेले.
आमदार सुरेंद्र पनवार हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या जवळचे मानले जातात. सोनीपतमध्ये काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यक्रमांच्या आयोजनाची जबाबदारी आमदार सुरेंद्र पनवार यांच्याकडे आहे. काही काळापूर्वी सुरेंद्र पनवार यांच्याकडे राज्याच्या सोशल मीडियाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती.