नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (एआय) दिल्ली न्यायालयात प्रवेश केला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात स्पीच टू टेक्स्ट फॅसिलिटीच्या आधी पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स पायलट हायब्रीड कोर्ट रूमचे उद्घाटन करण्यात आले आहे.
त्यामुळे न्यायाधीशांचे काम सोपे होणार आहे. न्यायाधीश जेव्हा एखाद्या खटल्याचा निर्णय देतील तेव्हा तो निर्णय एआय डिक्टेशनद्वारे रेकॉर्ड करेल आणि टाईप केला जाईल. यामुळे वेळेची बचत होईल, तसेच न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचा-यांची, विशेष करून टायपिस्ट यांची कार्यक्षमता वाढेल, असे बोलले जात आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती मनमोहन यांनी शुक्रवारी तीस हजारी न्यायालयात पहिल्या एआय-सुसज्ज पायलट हायब्रीड कोर्टरूमचे उद्घाटन केले. त्यांनी डिजिटल कोर्ट अॅपही सुरू केले. यावेळी न्यायमूर्ती मनमोहन म्हणाले की, न्यायप्रणाली सुधारण्यासाठी आणि न्याय वितरणातील विलंब कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे.