पुणे : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अतुल बेनके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी ही भेट पार पडली. मात्र ही भेट राजकीय नसल्याचे सांगतानाच शरद पवारांनी खळखळून हशा पिकवला.
अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी अजितदादा गटाचे आमदार अतुल बेनके आणि शरद पवार यांची भेट झाली. या भेटीनंतर शरद पवार यांना या भेटीसंबंधी विचारले गेले, तेव्हा ते म्हणाले, की अतुल बेनके मला भेटले यात नवीन काय आहे?
शरद पवार पुढे म्हणाले, की अतुल बेनके हे सध्या कुठल्या पक्षात आहेत, ते मला माहिती नाही. पण आमच्या दोघांमध्ये कुठलीही राजकारणाच्या विषयावर चर्चा झालेली नाही, गत लोकसभा निवडणुकीत ज्यांनी आमच्या उमेदवाराचे काम केले, ते आमचे, असे माझे मत आहे. पवारांच्या या वाक्यावर सगळेच खळखळून हसले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, की अतुलचे वडील म्हणजेच वल्लभ शेठ बेनके हे माझे मित्र होते. म्हणजे अतुल हा माझ्या मित्राचा मुलगा आहे. या भेटीत राजकारण आणता कामा नये, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
अजित दादांच्या बालेकिल्ल्यातच पक्षाला भगदाड
दरम्यान, दादा गटाला पिंपरी-चिंचवडच्या बालेकिल्ल्यात भगदाड पाडून अनेकांनी शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचा प्रकार ताजा असतानाच दादा गटातील विद्यमान आमदाराने शरद पवारांची घेतलेली भेट ही अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे.
कोण आहेत अतुल बेनके?
अतुल बेनके हे दिवंगत नेते वल्लभ शेठ बेनके यांचे सुपुत्र. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीत विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर तळ्यात-मळ्यात झालेल्या बेनके यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित दादा यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.
भेटीबद्दल आमदार बेनकेंना विचारा : अजित पवार
जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेबांची अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे अतुल बेनके राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याची चर्चा रंगली आहे. या भेटीवर अजितदादांनी भाष्य केले आहे. अतुल बेनके यांनी शरद पवारसाहेबांची भेट घेतल्याने काय झाले? अनेक आमदार माझी सुद्धा भेट घेतात. प्रसारमाध्यमांना बातम्या नसल्याने याची भेट घेतली, त्याची भेट घेतल्याचे वृत्त दाखविले जाते. त्यामुळे भेटीबद्दल आमदार बेनके यांना विचारा, असे अजितदादांनी म्हटले आहे.
अतुल बेनकेंची प्रतिक्रिया?
विधानसभा निवडणुकीला अजून दीड ते दोन महिन्यांचा कालावधी आहे. त्यावर आता भाष्य करण्यात काही अर्थ आहे का? यदाकदाचित आम्ही महायुती म्हणून पुढे जात आहोत, पण जागा वाटपावरून काहीही होऊ शकतं. यदाकदाचित अजितदादा आणि साहेब (शरद पवार) एकत्र येऊ शकतात. मी एक छोटा घटक आहे. राज्यातील २८८ आमदारांपैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे राजकारणात पुढे जात असताना पुढे काय घडेल, हे मी आता कसे सांगू शकतो. पवारसाहेब आणि आमच्यात पावसासंदर्भात चर्चा झाली असल्याचे बेनके यांनी सांगितले.