अहमदनगर : झिका या नव्या आजाराचे रुग्ण पुण्यापाठोपाठ आता सर्वत्र सापडू लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे झिकाचे दोन रुग्ण नव्याने सापडले आहेत. नागरिकांनी सतर्क राहून वेळीच उपचार करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
याअगोदर नगर जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये संगमनेर तालुक्यातील एका व्यक्तीला झिकाची लागण झाली होती. तो व्यक्ती आता आजारातून बरा झाला आहे. आता संगमनेर तालुक्यात दोन गरोदर महिलांना या आजाराची लागण झाली आहे.
तपासामध्ये दोन गरोदर महिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. नगरच्या जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच नाशिकच्या पथकाने संगमनेर या ठिकाणी धाव घेत या ठिकाणी सर्व गरोदर महिलांची तपासणी करून घ्यावी, अशा प्रकारचे निर्देश दिले होते. ज्या दोन महिलांना झिकाची लागण झाली होती, त्यांची तपासणी केली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे.