पुणे : मागील काही दिवसांपासून पर्यटनासाठी गेलेले पर्यटक पाण्यात वाहून जाण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता आणखी एका घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. पिंपरी-चिंचवडच्या थेरगाव येथे एम. एम. कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये शिकणा-या पाच विद्यार्थ्यांनी कॉलेजला दांडी मारून कासारसाई धरणावर फिरायला जाण्याचा प्लॅन केला.
याबाबतची माहिती त्यांच्या पालकांना होती ना शिक्षकांना होती. हे पाचही जण धरण परिसरात पोहोचले. तिथे त्यांनी मजा करायला सुरुवात केली. शिवाय त्यात त्यांना धरणाच्या पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही.
त्यानंतर ते पाचही जण धरणाच्या पाण्यात उतरले. खेळता खेळता त्यातील एकजण खोल पाण्यात गेला. तो काही क्षणातच पाण्यात वाहून गेला. त्यावेळी इतर चार मित्रांनी आरडाओरडा केला. त्यानंतर गावातील नागरिकांनी शिरगाव परंदवाडी पोलिसांना तात्काळ या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रेस्क्यू टीमने काही वेळातच या विद्यार्थ्याला शोधून काढले. पण खूप उशीर झाला होता. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला होता. सारंग रामचंद्र डोळसे (वय १७) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.