लातूर : प्रतिनिधी
यंदाच्या पावसाळ्याचा जुलै महिना संपत अता तरी लातूर जिल्ह्यात विशेषत: मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वदूर जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे. अधून-मधून पडणा-या पावसामुळे खरिपाची पिके जोमात असले तरी पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीला आधार देणा-या प्रकल्पांत अद्यापही पाण्याची पातळी वाढलेली नाही. मोठया प्रकल्पांसह मध्यम, लघू प्रकल्पांचीही तीच आवस्था आहे. टक्केवारीत पाऊस मोठा वाटत असला तरी प्रकल्प मात्र तहालेलेच आहेत.
लातूर जिल्ह्यात २० जुलैपर्यंत सरासरी २५० मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षीत असताना आतापर्यंत ३५०.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरासरी टक्केवारी १३६.८ एवढी आहे. जिल्ह्यात खरीपाच्या पेरण्या शंभर टक्के झालेल्या आहेत. सातत्याने कमी अधिक पाऊस पडत आहे. त्यामुळे खरिपाची पिके जोमात आहेत. पण, सर्वदुर जोरदार पाऊस न झाल्याने प्रकल्पांत मात्र पाणी पातळीत दखल घ्यावी अशी वाढ झालेली नाही. लातूर शहरासह बीड, धाराशिव जिल्ह्यांतील २१ योजनांना पाणीपुरवठा होणा-या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात अद्यापही उपयुक्त पाणीसाठा झालेला नाही. निम्न तेरणा प्रकल्पात सात टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील तावरजा, रेणापूर, व्हटी, तिरु, देवर्जन, साकोळ, घरणी व मसलगा हे आठ मध्यम प्रकल्पांत १५.४६३ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. १३४ लघू प्रकल्पांत ३४.००४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील एकुण १४४ प्रकल्पांत ७०.८५६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. या १४४ प्रकल्पांपैकी एक प्रकल्प शंभर टक्के भरलेला आहे. दोन प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा, तीन प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के, १३ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के, ३४ प्रकल्पांत २५ टक्क्यांच्या खाली पाणीसाठा आहे. ८४ प्रकल्प जोत्याखाली असून ७ प्रकल्प अद्यापही कोरडे आहेत.