पुणे : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री केली आहे. कसा निवडून येतो बघतोच तुला, असे म्हणत कोल्हेंनी अजित पवारांची मिमिक्री केली. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. शिवाय अमोल कोल्हेंनी अजित पवारांना गुलाबी जॅकेटवरुनही टोला लगावला. जयपूरला मेळावा असेल, असे ते म्हणाले. पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विजयी संकल्प मेळावा पार पडला. यावेळी अमोल कोल्हे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते.
अमोल कोल्हे म्हणाले, १५०० रुपयांमध्ये बहुमूल्य मत विकू नका. आता लाडका दादा योजना आणली आहे. युवकांना स्टायपेंड दिले जाणार आहेत. मात्र ही योजना फक्त सहा महिन्यांसाठी लागू आहे. मग त्यापुढं काय? त्यामुळे स्टाय पेंड पेक्षा पर्मनंट नोकरी बद्दल युवकांनी विचार करायला हवा. अमोल कोल्हे पुढे बोलताना म्हणाले, उद्या इथे कोणाचा तरी मेळावा आहे, मात्र मला असे समजले की मेळावा जयपूरला आहे. कारण काहींनी पिंक कलरला पसंती दिली आहे, आता कोणी कोणत्या रंगाला पसंती द्यायची. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. भोसरी विधानसभेत नेमके काय करायचे? हा खरा प्रश्न होता. पवार साहेबांच्या जादू ने अजित गव्हाणेंसारखे अनेकांची घरवापसी झाली. मुळात लोकसभेच्या प्रचारावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे भोसरी विधानसभेला वेळ देऊ शकले नाहीत. इतर जबाबदा-यांमुळे त्यांना येता आले नसेल. त्यामुळे नेमके विरोधात काम कोणी केले, हे सांगता येत नाही.
शरद पवारांचा पिंपरी चिंचवडमध्ये विजयी संकल्प मेळावा पार पडतोय. एकेकाळी अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. मेळाव्यापुर्वीचे शरद पवारांनी अजित गव्हाणे आणि त्यांच्या समर्थकांच्या हाती तुतारी देत अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. शरद पवारांच्या या खेळीनंतर अजित पवार ही खडबडून जागे झालेत. उर्वरित माजी नगरसेवक आणि पदाधिका-यांची उद्या बैठक घेतायत. त्यानंतर अजित पवारांचा मेळावा ही पार पडणार आहे. तत्पूर्वी शरद पवार आज अजित पवारांना कोणकोणत्या मुद्यावरून लक्ष करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.