जम्मू : जम्मू-काश्मीरमधील जम्मूत दहशतवाद्यांचे अचानक हल्ले वाढले आहेत. दहशतवादी गनिमीकाव्याने घातपाती कारवाया करीत आहेत. पाकिस्तानातील माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली हे दहशतवादी सीमेपलीकडून भारतात घुसखोरी करून हिंसाचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. भारतीय लष्कराने अनेक ठिकाणी छावण्या स्थापन केल्या आहेत.
जम्मू भागात गेल्या २ वर्षात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना लष्कराचे ५२ जवान शहीद झाले. पाकिस्तानातील माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली हे दहशतवादी सीमेपलीकडून भारतात घुसखोरी करून हिंसाचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. जम्मूतील सर्व जिल्ह्यांत घातपाती कारवाया करण्यासाठी सीमेपलीकडून दहशतवादी आले असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांची संख्या किती हे भारतीय गुप्तचर यंत्रणांना अद्याप कळू शकलेले नाही. कठुआ, राजौरी, पुंछ, दोडा, भद्रवाह, उधमपूर, किश्तवाड येथे गेल्या २ वर्षांत दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर अचानक हल्ले केले. त्यावेळी दहशतवादी अमेरिकी बनावटीच्या एम-४ कार्बाइनचा वापर केल्याचे आढळून आले आहे.
सुंदरबनी भागात संशयास्पद हालचाल
राजौरी, पुंछ आणि डोडा येथील हल्ल्यांतील दहशतवादी अद्याप पकडले गेले नाहीत. लवकरच दहशतवाद्यांचा समूळ नायनाट करू, अशी माहिती लष्करी अधिका-यांनी दिली. राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी भागात थेट नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद हालचाल आढळून आली. त्यावरून तात्काळ कारवाई करण्यात आली. डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी कारवाई करण्यात आली. तसेच जम्मूत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली.