रुद्रप्रयाग : गौरीकुंड-केदारनाथ पायी मार्गावर आज सकाळी मोठा अपघात झाला. चिरबासाजवळील टेकडीवरून अचानक दरड कोसळली. यात तीन भाविकांचा मृत्यू झाला तर आठ जण तखमी झाले आहेत. या दुर्घटनेवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, दरड कोसळल्याने यात्रेला जाणा-या तीन भाविकांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले असून, जखमींमध्ये काही भाविक महाराष्ट्रातील आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी ७.३० वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. किशोर अरुण पराते (३१, रा. नागपूर महाराष्ट्र), सुनील महादेव काळे (२४, रा. जालना महाराष्ट्र), अनुराग बिश्त, तिलवाडा रुद्रप्रयाग अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. केदारनाथमधील १६ कि.मी. लांबीच्या गौरीकुंड-केदारनाथ चालण्याच्या मार्गावर ही दरड कोसळली. या मार्गावर नेहमीच अशा घटना घडतात मात्र, प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना केलेली दिसून येत नाही. यामुळे दरवर्षी दरड कोसळल्याने अनेक
भाविकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेबद्दल केला शोक व्यक्त
दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी केदारनाथ मार्गावर दरड कोसळल्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट करून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक्सवर लिहिले की, टेकडीवरून ढिगारा आणि मोठमोठे दगड पडल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, याबाबत मी अधिका-यांच्या सतत संपर्कात आहे. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने चांगले उपचार देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ईश्वर दिवंगतांच्या आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, असे मुख्यमंत्री धामींनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.