28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रमाऊलींच्या परतीच्या प्रवासात वाद

माऊलींच्या परतीच्या प्रवासात वाद

सातारा : प्रतिनिधी
माऊलींच्या परतीच्या प्रवासामध्ये नीरा नदीवर वारकरी व विश्वस्तांमध्ये वाद निर्माण झाला आहे. माऊलींच्या पादुकांचे रथाच्या मागील वारक-यांना दर्शन न दिल्याने रथाच्या मागील वारक-यांनी रथापुढे येऊन ठिय्या आंदोलन केले. यावेळी माऊली… माऊलीच्या जयघोषात व टाळ वाजवत हे वारकरी अर्धा तास बसून होते. यामुळे गोंधळ उडाला. सोहळ्याचे मालक व विश्वस्त याबाबत कडक भूमिका घेत वारक-यांसोबत समझोता न करता रथ तसाच पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. याला वारक-यांकडून प्रखर विरोध होत आहे.

आषाढी एकादशीच्या दर्शनानंतर माऊलींचा पालखी सोहळा परतीच्या प्रवासाकडे निघाला आहे. परतीच्या प्रवासात रथापुढे २७ तर रथामागे ३५० दिंड्या आहेत. गुरुवारी पाडेगाव (ता. खंडाळा) येथील मुक्काम आटोपून शुक्रवारी सकाळी पावणेनऊ वाजता नीरा नदीच्या पवित्र तीर्थाने माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. यानंतर माऊलींचा पालखी सोहळा मालकांकडून पादुका रथाकडे येत असताना प्रथेप्रमाणे रथाच्या पुढे दोन ओळी व रथाच्या मागे दोन ओळी वारक-यांनी तयार केल्या होत्या.

सोहळा मालकांनी पादुकांचे वारक-यांना दर्शन देणे हा एक अविस्मरणीय क्षण असतो. यावेळी सोहळा मालकांनी रथाच्या पुढील दोन्ही ओळींना दोन्ही ओळीतील वारक-यांना पादुकांचे स्पर्श दर्शन दिले. मात्र परत जाताना रथाच्या मागील वारकरी विणेकरी व तुळशी घेतलेल्या महिलांना हे दर्शन दिले नाही.

सोहळा मालकांनी या पादुका पुन्हा रथात ठेवल्याने रथामागील वारकरी नाराज झाले व त्यांनी लागलीच रथापुढे येऊन ठिय्या आंदोलन केले. माऊली… माऊलीचा जयघोष करत टाळ वाजवत सुमारे एक तास माऊलींचा रथ अडवून धरला. यानंतर सोहळा प्रमुख, सोहळा मालक व आळंदी विश्वस्त यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र वारकरी आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. यादरम्यान मोठा गोंधळ उडाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR