नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने यंदाचा वर्ल्डकप गाजवला. त्याने वर्ल्डकप २०२३ मध्ये २४ विकेट्स घेतल्या. भारत फायनलमध्ये पोहोचला मात्र अंतिम सामना जिंकून वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. नुकतीच शमीने सोशल मीडियावर आपल्या आईसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली. त्यात त्याने आपली आई लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली.
वर्ल्डकप २०२३ हा शमीसाठी खूप खास राहिला. त्याला हार्दिक दुखापतग्रस्त झाल्यानंतर प्लेईंग ११ जागा मिळाली होती. त्यानंतर तो फक्त भारताचा नाही तर संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला. मोहम्मद शमीची आई अनुम आरा यांना भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्डकप फायनल सुरू होती त्यावेळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वृत्तानुसार त्यांना उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील सहारनपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मोहम्मद शमीच्या आई फायनल सामन्यादरम्यान अस्वस्थ झाल्या होत्या आणि त्यांना ताप आला होता अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. त्यानंतर त्यांना प्राथमिक उपचारानंतर दुस-या रुग्णालयात हलवण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. शमीची बहीण डॉक्टर मुमताज यांनी सांगितले की, त्यांना ताप आणि अस्वस्थपणा वाटत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आणि सामान्य झाली आहे.