26.2 C
Latur
Friday, November 15, 2024

हे होणारच होते!

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिची ‘यूपीएससी’ने उमेदवारी रद्द केल्यानंतर आता दिल्लीतील पतियाळा न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे तिच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पूजाने अटक टाळण्यासाठी दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाची सुनावणी बुधवारी दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयात झाली होती. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. हा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला.

पूजाच्या वकिलांनी तिला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जोरदार युक्तिवाद केला. पूजाने कोणतीही फसवणूक केलेली नाही. पूजाचे अपंगत्व प्रमाणपत्र अयोग्य कसे ठरते? पूजा महिला असल्याने तिला त्रास दिला जात असल्याचा दावा तिच्या वकिलांनी न्यायालयात केला. सरकारी वकिलांनी या प्रकरणात ब-याच बाबींची चौकशी होणे गरजेचे असल्याचे सांगितले. पूजाने किती वेळा नाव बदलून परीक्षा दिल्या, यासह अनेक बाबींची चौकशी होण्याची गरज असल्याचे सरकारी वकिलांनी तसेच ‘यूपीएससी’च्या वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले होते. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांना बुधवारी जोरदार दणका दिला. पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करून भविष्यात त्यांना ‘यूपीएससी’च्या कोणत्याही परीक्षेला बसण्यावर बंदी घातली. ‘यूपीएससी’ने उपलब्ध नोंदीची काळजीपूर्वक तपासणी केली आणि पूजाने ‘सीएसई-२०२२’ नियमातील तरतुदींविरुद्ध कृती केल्याचे आढळून आले.

त्या अनुषंगाने पूजा खेडकर यांची प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढे त्यांना ‘यूपीएससी’कडून घेण्यात येणा-या सर्व परीक्षांना बसण्यावर आणि निवडीवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय लोकसेवा आयोगाने गत १५ वर्षांतील नोंदी तपासल्या असता असे आढळले की, ‘सीएसई’ परीक्षा देण्यासाठी पूजाला जेवढी संधी देण्यात आली तेवढी संधी अन्य कोणालाही देण्यात आली नाही. त्या अशा एकमेव उमेदवार आहेत. पूजाने आपले नावच बदलले नाही तर आपल्या पालकांचेही नाव बदलले! हे त्यांना नियमापेक्षा अधिक वेळा परीक्षेला बसण्याची संधी मिळाल्याचे मुख्य कारण आहे. भविष्यात या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रचलित पद्धतीमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पूजाने बनावट ओळख देऊन मान्यतेपेक्षाही अधिक वेळा परीक्षेला बसण्याची अनुमती मिळवली. त्याबद्दल त्यांच्यावर १८ जुलै रोजी ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावण्यात आली होती. ‘यूपीएससी’ने बुधवारी पूजा खेडकरची उमेदवारी रद्द करण्याची कारवाई केली. ‘सीएसई’चे (नागरी सेवा परीक्षा २०२२)उल्लंघन केल्याप्रकरणी पूजाची उमेदवारी तात्पुरती रद्द करण्यात आली. पूजा मनोरमा दिलीप खेडकर हिने ओळख लपवून ‘यूपीएससी’ची परीक्षा दिली,

परीक्षेसाठी असलेल्या प्रयत्नांची मर्यादा पूजाने विविध पळवाटा शोधून बेकायदेशीररीत्या ओलांडल्या याबाबत ‘यूपीएससी’ने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. २५ जुलैपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास पूजाला सांगण्यात आले होते. मात्र, पूजाने ४ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून मागितली होती. पूजाची ही मागणी ‘यूपीएससी’ ने अमान्य केली आणि उत्तर सादर करण्याची मुदत २५ जुलै ऐवजी ३० जुलै केली. उत्तर सादर करण्यासाठीची ही शेवटची संधी असल्याचेही सांगण्यात आले होते. मुदतीत प्रतिसाद न दिल्यास कारवाई करण्यात येईल असे पूजाला स्पष्टपणे बजावण्यात आले होते. दरम्यान, न्यायालयात पूजा खेडकरची बाजू मांडताना अ‍ॅड. वीणा माधवन म्हणाल्या, पूजाविरोधात जी कलमे लावली आहेत त्यानुसार तिला अटक होण्याचा धोका आहे. पूजाने कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. तिच्यावर नाव बदलण्याचा आरोप आहे. मात्र, तिने नाव बदलल्याचे गॅझेटमध्ये आहे. खोटे अपंगत्व प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप आहे. मात्र, पूजाला अपंगत्वाचे प्रमाणपत्र एका डॉक्टरने दिलेले नाही तर आठ डॉक्टरांनी दिले आहे. हे प्रमाणपत्र ‘एम्स’ बोर्डाकडून देण्यात आले असून या प्रमाणपत्राची मूळ प्रत ‘यूपीएससी’ कडे सादर करण्यात आली असल्याने ही फसवणूक कशी ठरते, असा सवाल पूजाच्या वकिलांनी केला.

सरकारी वकील अ‍ॅड. श्रीवास्तव हे युक्तिवाद करताना म्हणाले की, पूजाने बनावटगिरी आणि फसवणूक केली आहे. तिने वारंवार आपली भूमिका बदलली आहे. त्यामुळे तिच्या चौकशीची गरज आहे. त्यासाठी कोठडी देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. पूजाला अटकपूर्व जामीन दिल्यास ती चौकशीसाठी सहकार्य करणार नाही. अतिरिक्त सत्र न्यायाधीश देवेंद्र कुमार जंगला यांनी पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. तसेच या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती देखील वाढवली. यूपीएससीत पूजाची कोणी मदत केली होती का? तसेच इतर उमेदवारांनी विनापात्रता इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि दिव्यांग (पीडब्ल्यूडी) कोट्याचा लाभ घेतला आहे का? याचा तपास करण्याचे निर्देश दिल्ली पोलिसांना दिले. जिल्हाधिका-यांविरोधात केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे आपल्याला लक्ष्य केले जात असून, आपल्यावर अटकेचे सावट आहे. त्यामुळे स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आपल्याला जामीन देण्यात यावा अशी मागणी पूजाने अंतरिम जामीन याचिकेद्वारे केली होती.

आयोगाने एखाद्याचे आयएएस पद काढून घेणे हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण आहे. आयोगाने गत १५ वर्षांतील सर्व दिव्यांग प्रमाणपत्रांची छाननी केली. त्यात १४,९९९ उमेदवारांचे प्रमाणपत्र योग्य असल्याचे आढळून आले आणि एकट्या पूजा खेडकरचे प्रमाणपत्र बनावट निघाले. पुण्यात पूजाने आपल्या कारवर लाल दिवा लावला होता आणि वेगळे कार्यालय देण्याची मागणी केली होती. पुण्यातील प्रतापामुळे तिची वाशिमला बदली करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकरविरुद्ध तक्रार दाखल केली होती. आता पूजाने त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.

शेवटी केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकर यांची प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून केलेली निवड रद्द केली हे योग्यच झाले. खेडकर कुटुंबियांनी नियमबा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. यापुढे असे प्रकार होऊ नयेत यासाठी सर्व प्रकारची काळजी घेण्यात येईल असे आयोगाने म्हटले आहे. नक्कीच त्यांनी तशी काळजी घ्यावी आणि प्रामाणिकपणे परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा तसेच खोटेपणा करण्यासाठी पूजा खेडकरला कोणी मदत केली, गैरप्रकाराकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले का याचीही सखोल चौकशी करावी.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR