मुंबई : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून भाज्यांचे भाव गगनाला भिडले होते. ही भाववाढ नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना अखेर कामास आल्या असून, कांद्यासह बटाटे व टोमॅटोचे भाव कमी होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. आवक वाढल्यामुळे सर्वत्र २९ जुलैपासून टोमॅटोचे भाव कमी होण्यास सुरुवात झाली. शंभरी ओलांडलेले टोमॅटो ५० रुपये किलोवर आले आहेत.
कांद्याच्या भावातही दहा रुपयांची घसरण झाली आहे.
दरम्यान, ‘एनसीसीएफ’ने मुंबई, दिल्लीसह अनेक ठिकाणी स्टॉल लावून ६० रुपये किलो दराने टोमॅटो विकले. स्वस्त टोमॅटो उपलब्ध झाल्यामुळे खुल्या बाजारात भाव खाली आले आहेत. मुंबईत ४ ठिकाणी सरकारकडून टोमॅटो स्वस्त विकले जात आहेत. गेल्या वर्षी टोमॅटोचे दर २०० रुपये प्रतिकिलोपेक्षा जास्त होते.
यंदा मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत. ते आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
५० रुपये किलोने विकणार
टोमॅटोचे वाढते भाव कमी करण्यासाठी सरकार शुक्रवारपासून ५० रुपये प्रति किलो या दराने टोमॅटोची विक्री करणार आहे. मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक वाढू लागल्यामुळे दर नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे. एक आठवड्यात होलसेल मार्केटमध्ये टोमॅटोचे दर प्रतिकिलो ४० ते ७० रुपयांवरून १५ ते ४० रुपयांवर आले आहेत.