पुणे : पुणे शहरात झिका व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत, रुग्णसंख्या ५२ वर पोहोचली आहे. आतापर्यंत शहरातील झिकाचा संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या ४ जणांच्या मृत्यूंचे परीक्षण करणार आहे. त्यातून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
पुणे महापालिका हद्दीतील आणखी दोन झिकाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. मृत्यूनंतर प्राप्त झालेल्या रुग्णांच्या नमुन्यांचा झिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मृत रुग्णांमध्ये कोथरूड मधील ६८वर्षीय, तर बाणेर येथील ७८ वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. यापूर्वी दोन ज्येष्ठांचा झिकामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यांना इतर व्याधी देखील असल्याने त्यांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास करण्यात येत आहे.