जिरीबाम : वृत्तसंस्था
मणिपूरच्या जिरिबाममध्ये शांतता राखण्यासाठी मैतेई आणि हमार समुदायांमध्ये एक करार झाला होता. पण करारानंतर अवघ्या २४ तासांत जिरीबाममध्ये हिंसाचाराचा डोंब उसळला आहे. येथे मैतेई कॉलनीत गोळ्या झाडण्यात आल्या असून, लालपाणी गावात एका घराला आग लावण्यात आली.
मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त जिरीबाम जिल्ह्यात परिस्थिती सुधारण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी मैतेई आणि हमार समुदायांच्या प्रतिनिधींनी एकत्र काम करण्याचे मान्य केले होते. गुरुवारी आसाममधील कछार येथील सीआरपीएफ सुविधा केंद्रात झालेल्या बैठकीत समोरासमोर बसून दोन्ही पक्षांमध्ये एक करार झाला होता.
या करारात दोन्ही बाजूची परिस्थिती सामान्य करण्यासाठी, जाळपोळ कमी करण्यासाठी, गोळीबाराच्या घटना थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील असा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी रात्री सशस्त्र लोकांनी गावातील एका घराला आग लावली. गावाला लक्ष्य करत गोळ्यांच्या अनेक फैरी झाडण्यात आल्या.
या घटनेनंतर परिसरात सुरक्षा दल पाठवण्यात आले आहेत. अधिका-यांनी सांगितले की, सुरक्षेतील त्रुटींचा फायदा घेत हल्लेखोरांनी जाळपोळ केली. गेल्या वर्षी मे पासून, मैतेई आणि इम्फाळ खो-याच्या आसपासच्या डोंगराळ भागात असलेल्या कुकी-जो गटांमधील जातीय हिंसाचारात २०० हून अधिक लोक मारले गेले आणि हजारो बेघर झाले आहेत.
मणिपूरमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यापासून झालेल्या हिंसाचारात २२५ जणांचा मृत्यू झाला आहे. ५९,४१४ लोक विस्थापित झाले असून त्यांना ३०२ शिबिरांमध्ये हलविण्यात आले आहे. ११,१३३ घरे जाळण्यात आली. ४,५६९ घरे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. वांशिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण जिरीबाममध्ये वांशिक हिंसाचाराचा मोठा फटका बसला नाही. मात्र, यावर्षी जूनमध्ये शेतात एका शेतक-याचा विकृत मृतदेह आढळल्यानंतर येथेही हिंसाचार सुरू झाला.