25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रविशाळगड हिंसाचार प्रकरणी अल्पसंख्याक आयोगाच्या मुख्य सचिवांना नोटीस

विशाळगड हिंसाचार प्रकरणी अल्पसंख्याक आयोगाच्या मुख्य सचिवांना नोटीस

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावून १३ ऑगस्टपर्यंत तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून आयोगाने राज्य सरकारला नोटीस काढली आहे.

अतिक्रमणाच्या नावाखाली कट्टर उजव्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या संघटनांनी मुस्लिम समाजावर केलेल्या अत्याचार आणि हिंसाचाराच्या माझ्या तक्रारीची आयोगाने दखल घेतली आहे. माझ्या समाजातील संबंधितांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबध्द आणि बांधील आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी माझा लढा सुरूच राहील, असे शेख यांनी या संदर्भात सांगितले.

विशाळगडावर कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी मुस्लिम समाजावर अत्याचार करत असताना महाराष्ट्र पोलिस बघ्याच्या भूमिकेत होते त्यामुळे पोलिसांवरचा समाजाचा विश्वास उडाला आहे. त्यासाठी, हिंसाचार करणा-यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या आधी रईस शेख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना पत्र लिहून विशाळगड हिंसाचाराची सीआयडी चौकशी, हिंसाचारात सहभागी असलेल्यांना तडीपार करण्याची आणि बाधितांना १५ दिवसांत नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR