23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात मुसळधार!

पुण्यात मुसळधार!

धरणे भरल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू

पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरात काल रात्रीपासून संततधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. मागील महिन्यात पावसामुळे पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. धरणातून मोठ्या प्रमाणात झालेल्या विसर्गामुळे पुण्यातील नदीकाठच्या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.

आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे.

पुण्यातील पाऊस आणि धरणातून मोठ्या प्रमाणात होणारा विसर्ग लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरपरिस्थिती भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. पुण्यात प्रशासकीय यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. कालही महापालिका, जलसंपदा विभाग, अग्निशमन दल यांना सूचना दिल्या होत्या. पाणी सोडण्याअगोदर लोकांना सूचित करा, सायरन वाजवा असे सांगण्यात आले आहे. लष्कराशी आमचे बोलणे झाले आहे. जिकडे पूरपरिस्थिती आहे तिकडे एनडीआरएफ आणि लष्कर तैनात करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे मिळून २६.९९ टीएमसी पाणी वाढले असून ९२.५८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तर आज सकाळी ११ वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये सुरू असणारा २९ हजार ४१४ क्युसेकने होणारा विसर्ग वाढवून ३५ हजार २ क्युसेक करण्यात आला आहे. मुळशी धरणातून मुळा नदीत सुरू असणारा २४ हजार ७४५ क्युसेक विसर्ग वाढवून दुपारी १ वाजता २७ हजार २८२ करण्यात येणार आहे. धरणातून होणारा विसर्ग पाहता पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून सिंहगड रोड परिसरात एकता नगरी, सरिता नगरी, डेक्कन नदीपात्र, एरंडवणा, खिलारेवाडी, दत्तवाडी, विश्रांतवाडी येथे व इतर ठिकाणी दलाचे अधिकारी व जवान टॉर्च, रस्सी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, मेगा फोन्स व बोट अशा बचाव साहित्यासह तैनात असून मेगा फोनवरून सूचना देण्यात येत आहेत.

अजित पवारांनी दिले निर्देश
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. त्यासाठी स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षित निवा-याची सोय करावी. त्यांना संपूर्ण मदत, सहकार्य करावे, असे निर्देश वरिष्ठ अधिका-यांना देण्यात आले आहेत. पूररेषेलगतच्या नागरिकांनीही आवश्यक काळजी घ्यावी, प्रशासनानेही त्यांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR