नाशिक : शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. रामकुंडावरील छोटी-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. मारुतीच्या पायापर्यंत पुराचे पाणी आले आहे.
यंदाच्या पावसाळ्यातला पहिलाच पूर पाहण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली आहे. रामकुंड परिसरातील छोट्या-मोठ्या दुकानदारांना दुकाने हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गंगापूर धरण हे ८० टक्क्यांपर्यंत भरले आहे. आज दुपारनंतर गंगा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच नांदूरमधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नांदूरसह इतर पाच गावांचा संपर्क तुटला आहे.
नाशिकच्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस सुरू आहे. यामुळे ५०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. धरणामध्ये ८० टक्के पाणीसाठा झाला आहे. गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणात आला आहे.
गावांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात
नाशिक जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून गोदावरीने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. गोदावरी नदीच्या कडेला असलेला चांदोरी, सायखेडा, करंजवन गावांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आता गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.