जळगाव : धरणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांसह आतेभावाचाही बुडून मृत्यू झाला. यामुळे गावात शोककळा पसरली आहे.
या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून दोनजण बचावले आहेत. मृतांमध्ये मोहम्मद एजाज नियाज मोहम्मद मोमीन हा १२ वर्षांचा, मोहम्मद हसन नियाज मोहम्मद मोमीन हा १६ वर्षांचा असून दोघेही पारोळातील बडा मोहल्ला येथे राहणारे होते.
तर आवेश रजा मोहम्मद जैनुद्दीन हा १५ वर्षांचा मुलगा नाशकातील मालेगावमध्ये राहायला होता. यातील एजाज आणि हसन हे दोघे सख्खे भाऊ तर आवेश हा त्यांचा आतेभाऊ होता. आवेश दोन दिवसांपूर्वीच मालेगावहून पारोळा येथे आला होता.
पारोळा शहरातील बडा मोहल्ला भागातील मुले भोकरबारी धरणाकडे पोहायला गेले होते. तिथे हे तिघेजण पाण्यात उतरले. तिघांनाही पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. यामुळे ते बुडत गेले. जीव वाचवण्यासाठी त्यांनी ओरडायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत असलेल्या अश्रफ पीर मोहम्मद आणि इब्राहिम शेख अमीर यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यात यश आले नाही.