यवतमाळ : प्रतिनिधी
सध्या राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे. मराठा आरक्षणासाठी झगडणारे मनोज जरांगे पाटील हे आम्हाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवे आहे, अशी मागणी करत आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे, अशी ओबीसी नेत्यांची मागणी आहे. असे असतानाच दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून आक्षणाच्या मुद्यावर भाष्य करताना दिसतायत. त्यांनी यवतमाळच्या सभेत बोलताना मोठं भाष्य केलंय. कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, असे ते म्हणाले.
कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा. विधिमंडळ सभागृहात १९० कुणबी मराठा आमदार असून केवळ ११ ओबीसी आमदार आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला १०० टक्के धोका आहे, असे खळबळजनक विधान वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते यवतमाळच्या पुसदमध्ये जाहीर सभेला संबोधित करत होते.
कुणबी मराठा आमदार धनगर, माळ्यांसोबत नाही
कुणबी मराठ्यांपासून सावध राहा. आताचं जे सभागृह आहे, त्यामध्ये १९० कुणबी समाजाचे आमदार आहेत. फक्त ११ आमदार हे ओबीसी समाजाचे आहेत. कुणबी हा स्वत:ला ओबीसी म्हणत असला तरी तो सभागृहात मी मराठ्यांसोबत आहे, असे सांगतो. तो धनगरांसोबत नाही, तो माळ्यांसोबत नाही, तो वंजारी, लिंगायत, बंजारा यांच्यासोबत नाही. तो तेली, तांबोळी, कुणबी, लोहार, सोनार यांच्यासोबत तर अजिबातच नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
ओबीसींच्या आरक्षणाला धोका आहे
म्हणूनच मी सावध राहा असे सांगत आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धोका आहे. हा धोका १०० टक्के आहे. निवडणुकीनंतर हा धोका निर्माण होईल. माझ्या आधीच्या वक्त्याने सांगितले की ओबीसींची जातगणना झाली पाहिजे. ही जनगणना झाली पाहिजे, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.