कोलंबो : दुस-या वन-डे सामन्यात प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेने भारताला २४१ धावांचे आव्हान दिले. फिरकीपटूंना पोषक खेळपट्टीवर सलामीवीर अविष्का फर्नांडो (४०), कामिंडु मेंडिस (४०) आणि दुनिथ वेल्लालागे (३९) या फलंदाजांच्या चिवट खेळीच्या जोरावर श्रीलंकेने २४० धावांपर्यंत मजल मारली. सुरुवातीच्या फलंदाजांना झटपट माघारी धाडल्यानंतर, श्रीलंकेच्या शेपटाने भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. ६ बाद १३६ या धावसंख्येवरून वेल्लालागे-मेंडिस जोडीने श्रीलंकेला दोनशेपार नेले. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ३ बळी घेतले.
यजमान श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण पहिल्याच चेंडूवर भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजने पाथुम निसंकाला झेलबाद केले. त्यानंतर दुसरा सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिस या जोडीने संघाला ७४ धावांची भागीदारी करून दिली. अखेर वॉशिंग्टन सुंदरने ही जोडी फोडली. त्याने अविष्का फर्नांडो आणि कुसल मेंडिस यांना सलग दोन षटकांत माघारी धाडले. अविष्काने ५ चौकारांच्या मदतीने ४० धावा केल्या. तर कुसल मेंडिसने ३ चौकारांच्या मदतीने ३० धावा केल्या. त्यानंतर सदीरा समरविक्रमा आणि कर्णधार चरिथ असलंका यांच्यात भागीदारीला बहरु लागली होती. पण अक्षर पटेलने समरविक्रमाला १४ धावांवर माघारी पाठवले. जनीथ लियानागेदेखील १२ धावांवर कुलदीप यादवला झेल देऊन बसला. कर्णधार चरिथ असलंकाला चांगली सुरुवात मिळाली होती. पण वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीने त्यालाही जाळ्यात ओढले. तो ३ चौकारांसह २५ धावा काढून बाद झाला. त्यामुळे श्रीलंकेची अवस्था ३५ व्या षटकापर्यंत ६ बाद १३६ झाली होती.
शेवटच्या १५ षटकांत मात्र चित्र पालटले. दुनिथ वेल्लालागे आणि कमिंडु मेंडिस या दोघांनी श्रीलंकेचा डाव सावरला. दोघांमध्ये ७२ धावांची भागीदारी केल्यानंतर अखेर कुलदीप यादवने दुनिथ वेल्लालागेला बाद केले. त्याने १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या. त्यानंतर अकिला धनंजयच्या साथीने कंिमडुने झुंज सुरु ठेवली. कमिंडुने ४ चौकारांच्या मदतीने ४० धावा केल्या. तर अकिला धनंजयने २ चौकारांच्या सहाय्याने १५ धावा करत संघाला ९ बाद २४० धावा केल्या.