पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत सोमवारी (५ ऑगस्ट) नेमबाजीतील स्कीट प्रकारात मिश्र गटात भारताच्या महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंग यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. कांस्य पदकाच्या लढतीत महेश्वरी आणि अनंतजीत यांना चीनची जोडी यिटींग जियांग आणि जियानलीन ल्यू यांनी अवघ्या एका पाँइंटच्या फरकाने पराभूत केले. या लढतीत चीनच्या जोडीने ४४ पाँइंट्स मिळवले, तर भारताच्या जोडीला ४३ पाँइंट्स मिळाले.
अखेरपर्यंत या दोन्ही जोड्यांमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळाली होती. मात्र अखेरच्या क्षणी चीनने बाजी मारली आणि भारताचे पॅरिस ऑलिम्पिकमधील चौथे पदक थोडक्यात हुकले. जर महेश्वरी आणि अनंतजीत यांनी पदक जिंकले असते, तर भारताचे हे स्किट प्रकारातील पहिलेच ऑलिम्पिक पदक ठरले असते. दरम्यान, आता या दोघांचेही पॅरिस ऑलिम्पिकमधील आव्हान संपले आहे.
यापूर्वी महेश्वरी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या वैयक्तिक स्कीट प्रकारातही सहभागी झाली होती. पण क्वालिफिकेशनमध्ये १४ व्या क्रमांकावर राहिली होती, तर अनंतजीतही पुरुषांच्या वैयक्तिक स्कीट प्रकारात २४ व्या क्रमांकावर राहिला होता.