परभणी : शहरातील संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने भाजपा विधानसभा अध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली परभणी शहरात प्रथमच श्रावण मासारंभानिमित्त सोमवार, दि.५ ऑगस्ट रोजी कावड यात्रा काढण्यात आली. श्री क्षेत्र त्रीधारा येथून या कावड यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. वसमतरोड मार्गाने काढण्यात आलेल्या या कावड यात्रेत हजारो शिवभक्तांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
श्री क्षेत्र त्रीधारा येथून सोमवारी सकाळी ९ वाजता पहिल्या श्रावणी सोमवारी कावड यात्रेला सुरूवात करण्यात आली. श्री क्षेत्र त्रीधारा येथील त्रिवेणी संगम असलेल्या नदी पात्राचे विधीवत पुजन करून कावड यात्रेला सुरूवात करण्यात आली. परभणी शहरात ही कावड यात्रा दाखल होताच ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात येते होते. विविध पथकांसह शिवभक्त सहभागी झाले होते.
परभणी शहरातील वसमतरोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, नारायण चाळ, अष्टभुजा देवी मंदीर, गांधी पार्क, छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी ही कावड यात्रा येताच शिवभक्तांनी जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर शहरातील पारदेश्वर मंदिरात शिवलिंगाचा अभिषेक करून या यात्रेचा समारोप करण्यात आला.
या कावड यात्रेत हजारो शिवभक्तांनी सहभाग नोंदवला होता. या कावड यात्रेमुळे शहरात भक्तीमय वातावर निर्माण होवून शिवभक्तात उत्साह निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. या निमित्ताने ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबत तैनात करण्यात आला होता.