लातूर : प्रतिनिधी
राज्यातील २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लातूर तालुक्यातील ८५ हजार ४६४ महिलांनी ऑनलाईन अर्ज कलेले आहेत. अर्जांची छाननी तालुकास्तरावर करण्यात येत आहे. या छाननी प्रक्रियेसाठी तीन शिफ्टमध्ये ४० कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त अर्जांची ऑनलाईन छाननी प्रक्रिया जिल्ह्यात सुरु आहे. यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर छाननी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर पंचायत समिती येथे आयोजित शिबिराला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दि. ५ ऑगस्ट रोजी भेट देवून येथील कामकाजाचा आढावा घेतला. गट विकास अधिकारी तुकाराम भालके, सहाय्यक गट विकास अधिकारी मुक्तापुरे, विस्तार अधिकारी पोलकर, नल्ले, लातूरच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती क्षीरसागर आणि मुरुड बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती माळी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अधिकारी कर्मचारी व सेवक यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी या शिबिराला भेट दिली. तसेच त्यांनी छाननी प्रक्रियेसाठी नियुक्त्त अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. अर्ज छाननीमध्ये येणा-या अडचणी जाणून घेत त्यांना याबाबत मार्गदर्शन केले. गट विकास अधिकारी भालके यांनी आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची माहिती दिली. यावेळी त्यांच्या हस्ते पंचायत समिती कार्यालयासमोर बेलाच्या रोपाची लागवड करण्यात आली.