भंडारा : पूर्ववैमनस्यातून भांडणाच्या घटना सातत्याने घडत असतात. ग्रामीण भागात जुन्या भांडणाचा राग मनात धरून मारहाण केल्याची किंवा हत्या, हत्येचा प्रयत्न केल्याची अनेक प्रकरणे आहेत. आता, भंडारा जिल्ह्यातही असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामध्ये, मुलाच्या खूनाचा बदला घेण्यासाठी चक्क बापानेच आरोपीच्या घरावर गोळीबार केला आहे.
वर्षभरापूर्वी भंडा-यात झालेल्या गँगवॉरमध्ये अभिषेक कटकवार याची भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपुर इथे २२ ऑगस्ट २०२३ ला निर्घृण हत्या करण्यात आली होती. मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी वडील सावन उर्फ भोलू कटकवार आणि चेतन तिघरे या दोघांनी दुचाकीवरुन मुलाच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या चिराग गजभिये याची हत्या करण्याचा कट रचला होता. मात्र, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मुलाच्या खूनप्रकरणात आरोपी असलेला चिराग गजभिये हा १ जून रोजी कारागृहातून जामिनावर बाहेर आला आहे.
चिरागच्या हत्येसाठी सावन आणि चेतन यांनी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्याचे घर गाठले. त्यांच्याजवळ देशीकट्टा आणि धारदार शस्त्र होते. या हत्यारांचा वापर करुन मुलाची हत्या करणा-या आरोपीला संपवायचे, असा कट दोघांनी रचला होता. चिराग गजभिये याचे घर समजून सावन याने त्याच्याकडील देशी कट्ट्यातून एक गोळी शेजारच्या सम्राट शहरे यांच्या घरावर गोळीबार केला. चिरागने एक गोळी झाडली, मात्र ती गोळी भिंतीवर आदळल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, गोळीबार झाल्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक धावत येत असल्याचे बघून दोन्ही आरोपींनी दुचाकीवरून पळ काढला. जिल्हा पोलिस अधीक्षक लोहीत मतानी, अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, ठाणेदार सुभाष बारसे हे पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले.
भंडारा पोलिसांनी शहराची नाकाबंदी करून सावन कटकवार आणि चेतन तिघरे या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून देशीकट्टा, ५ जिवंत काडतूस आणि धारदार शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. या आरोपींनी आर्या नामक व्यक्तीकडून हा देशीकट्टा विकत घेतला असून पोलिस आता त्याचा शोध घेत आहे.