23.5 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रडाळींच्या दरात घसरण

डाळींच्या दरात घसरण

महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा

मुंबई : प्रतिनिधी
डाळींच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसत होते. मात्र, सरकारच्या नवीन धोरणामुळे सध्या डाळीच्या दरात घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. एका वर्षाहून अधिक काळ झाला महागाई दर हा १० टक्क्यांच्या वर आहे. किमती नरमल्याने महागाईचा दरही कमी होईल, अशी सरकारला आशा आहे.

खाद्यपदार्थांच्या गगनाला भिडलेल्या किमतींनी हैराण झालेल्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जवळपास वर्षभराच्या त्रासानंतर आता डाळींचे भाव उतरू लागले आहेत. येत्या काही महिन्यांत किमती आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे. गेल्या एक महिन्यापासून देशातील विविध बाजारपेठांमध्ये डाळींच्या किमती घसरत आहेत.

अहवालानुसार हरभरा, तूर आणि उडीद या डाळींच्या किमती कमी झाल्या आहेत. ही बाब सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे. कारण एका वर्षाहून अधिक काळ डाळींचे भाव वाढतच होते. डाळींचा किरकोळ महागाईचा दर जानेवारीमध्ये १९.५४ टक्के होता, तो जूनमध्ये १६.०७ टक्क्यांवर आला आहे.

ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, तूर डाळीची किरकोळ किंमत १६० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आली आहे. महिनाभरापूर्वीच्या तुलनेत ही घट ५.८ टक्के आहे. त्याचप्रमाणे मसूर डाळ महिनाभरापूर्वीच्या तुलनेत १० टक्के स्वस्त होऊन ९० रुपये किलोपर्यंत खाली आली आहे. प्रमुख बाजारात हरभरा, तूर आणि उडीद डाळीच्या किमती गेल्या एका महिन्यात ४ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

येत्या काही महिन्यांत डाळींच्या किमती आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे आयातीत झालेली वाढ हे किमती कमी होण्याचे मुख्य कारण आहे. डाळींच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने तूर, उडीद आणि मसूर डाळ यांच्या शुल्कमुक्त आयातीला ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे डाळींची आयात वाढत आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताने ४.७३ दशलक्ष टन डाळींची आयात केली होती. जी २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ९० टक्के अधिक आहे.

तूर, हरभरा डाळीवर साठा मर्यादा वाढवली
तूर आणि हरभरा डाळीवर सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत साठा मर्यादा घातली आहे. यामुळे उपलब्धता सुधारण्यासही मदत होत आहे. दुसरीकडे चांगला पाऊस झाल्याने डाळींच्या पेरण्या वाढत आहेत. २ ऑगस्टपर्यंत ११.०६ दशलक्ष हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली होती. जी एका वर्षापूर्वीच्या तुलनेत सुमारे ११ टक्के अधिक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR