पुणे : प्रतिनिधी
गीता पठण करताना स्मरण,पठण याबरोबरच मनन, चिंतन,आणि अनुसरण हे घटक महत्वाचे असून याचा समन्वय साधला गेला तर आनंद मिळतो. संपूर्ण गीतेचा अर्थ या पांच घटकात सामावला आहे म्हणूनच गीता पठणाचे ज्ञान घरोघरी,मनोमनी पोहचणे आवश्यक असे गीताधर्म मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मुकुंद दातार यांनी सांगितले.
दोन वर्षाच्या कालावधीत एक लाख गीतापाठ पूर्ण करण्याचा संकल्पपूर्ती सोहळा साजरा करण्यात आला गीताव्रती संध्या कुलकर्णी यांनी हा संकल्प केला होता.त्याची पूर्तता सोहळ्याने झाली.जेष्ठ अर्थतज्ञ ह.भ.प.अभय टिळक गीता धर्म मंडळ प्रमुख संयोजक आणि राष्ट्रीय कीर्तनकार मोरेश्वर जोशी लातूर येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रवीण सरदेशमुख आणि गीताव्रती संध्या कुलकर्णी व्यासपीठावर होते.राज्याच्या विविध जिल्ह्यातून भगिनी या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या .
गीता पठणाचे महत्व स्पष्ट करून दातार म्हणाले की,आजच्या काळात ज्ञानदान महत्वाचे आहे आणि गीता पठणाचे ज्ञान घरोघरी आणि मनोमनी पोचणे आवश्यक आहे.अर्थतज्ञ टिळक यांनी मानवी जीवनातील भगवद गीतेचे महत्व सांगितले आणि १८ अध्याय पूर्ण करणे हे भाग्य आहे यामुळे नामचिंतन आणि अंतकरण शुद्धता होते मना- मनाला प्रोत्साहन मिळते. आपले काम सदबुद्धिने आणि चांगल्या भावनेने पूर्ण करणे हीच खरी पूजा आहे.
राष्ट्रीय कीर्तनकार जोशी म्हणाले की,या गीता पठण संकल्पात सर्वांचा सहभाग उस्फूर्त असून त्यामागची भावना महत्वाची आहे आजच्या काळात संस्काराची गरज आहे एकीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असताना असे संकल्प करणे नक्कीच स्वागतार्ह आहे तर सरदेशमुख यांनी मराठवाड्यात भगवदगीता प्रसारासाठी गेल्या दोन वर्षापासून करण्यात येत असर्णाया उपक्रमाची माहिती सांगितली.
गीताव्रती संध्या कुलकर्णी यांनी गेल्या दोन वर्षातील संकल्पाबाबतची सविस्तर माहिती सांगितली राज्यातील विविध जिल्ह्यात तसेच तीर्थक्षेत्री गीता पाठ करण्याचे भाग्य लाभले. या कालावधीत ऑनलाईन आणि ऑफलाईन गीतापाठ पूर्ण करता आले.असे त्यांनी सांगितले. निवेदिका शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन तर रूपाली वराडे यांनी आभार मानले.