टोकियो : वृत्तसंस्था
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून देणारा नीरज चोप्रा पुन्हा एकदा सोनेरी कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या फायनलचे तिकीट मिळवण्यात त्याने यश मिळवले.
मंगळवारी भालाफेकपटूंची पात्रता फेरी पार पडली. ऑलिम्पिकमध्ये पात्रता फेरीत ८४ मीटर भाला फेकल्यास थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळतो. हे अंतर गाठणारा खेळाडू फायनलसाठी पात्र ठरतो. नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर भाला फेकून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. त्यामुळे तो आता सलग दुस-यांदा सुवर्ण पदकाला गवसणी घालतो का याकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले आहे. ८ तारखेला नीरज पदकासाठी मैदानात असेल.
भारतीय अॅथलेटिक्स विश्वाला सोनेरी दिवसांची अनुभूती देणारा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुन्हा एकदा नवे कीर्तिमान रचण्यासाठी ८ तारखेला मैदानात उतरेल. टोकियो ऑलिम्पिकची पुनरावृत्ती करण्याबरोबरच १४० कोटी भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे यावेळी नीरजच्या खांद्यावर असेल. तसेच त्याच्यासमोरचे आव्हान काहीसे कठीण असल्याचे बोलले जात आहे. कारण गेल्या काही काळापासून दुखापतींचा ससेमिरा नीरजच्या मागे लागला आहे. आज, मंगळवारी भालाफेकपटूंची पात्रता फेरी पार पडली. या फेरीत पहिल्याच प्रयत्नात नीरजने लक्ष्यापेक्षा ४ मीटर लांब भाला फेकला अन् फायनलमध्ये प्रवेश मिळवला. मागील काही कालावधीपासून नीरजने अनेकदा दुखापतीचा सामना केला.