ढाका : वृत्तसंस्था
शेख हसीना यांनी देश सोडताच बांगलादेशमध्ये उत्पात सुरु झाला आहे. बांगलादेश हा मुस्लीम बहुल देश आहे. त्यामुळे याठिकाणी राहणा-या हिंदूंच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. आंदोलकांमधील कट्टर लोकांकडून हिंदू मंदिर लक्ष्य केलं जात आहे.
बांगलादेशच्या खुलना भागातील मेहरपूरमधील इस्कॉन मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे. याठिकाणी मूर्तींची तोडफोड करण्यात आली. तसेच, मंदिराला आग लावण्यात आली. दोघांचा यात मृत्यू झाल्याची माहिती आहे. इस्कॉन मंदिराचे प्रवक्ते युधिष्ठिर गोविंद यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.
मेहरपूरमधील हिंदू मंदिरात आग लावण्यात आली, त्यानंतर भगवान जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा यांच्या मूर्ती फोडण्यात आल्या. बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे कार्यकर्ते धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे देशात हिंदू धोक्यात आले आहेत.
इस्कॉनचे कृष्णादास यांनी सांगितले की, २९ जिल्ह्यांमधील हिंदू मंदिरांना आणि हिंदूंना लक्ष्य करण्यात आले आहे. ढाकामधील इस्कॉन मंदिरावर देखील हल्ला करण्यात आला आहे. बांगलादेशमध्ये जेव्हा परिस्थिती अस्थिर होते, तेव्हा त्यांचे पहिले लक्ष हिंदू मंदिर असतात. सध्या हिंदू लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ते घराला आतून कुलूप लावून राहात आहेत. त्यांच्यावर कधीही हल्ला होऊ शकतो.
अमेरिकेला झळ
देशातील नागरिकांमध्ये हसीना यांच्या कुटुंबाबद्दल प्रचंड राग भरला आहे. याचे पडसाद अमेरिकेतही उमटले आहेत. आंदोलकांनी न्यूयॉर्कमधील बांग्लादेश वाणिज्य दूतावासात घुसून माजी राष्ट्रपती आणि शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो काढून टाकला. याशिवाय काही आंदोलकांनी घोषणाबाजी करत संसद भवनात घुसून मालमत्तेची लूट आणि तोडफोड केली. शेख हसीना यांच्या अधिकृत निवासस्थानात आंदोलक घुसल्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
भारताने संसदेत भूमिका मांडली
मंगळवारी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बांग्लादेशातील परिस्थितीवर राज्यसभेत निवेदन दिले आणि भारताची भूमिका स्पष्ट केली. बांग्लादेशात लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि तेथील अल्पसंख्याक समुदाय हिंदूंना लक्ष करण्यात येत आहे, असे परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय, केंद्र सरकार या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती त्यांनी संसदेत दिली.
दहशतवादी पसार
देशात सत्तापालट झाल्यानंतर परिस्थिती आणि व्यवस्था कोलमडली आहे. दरम्यान, देशातील तुरुंगही रिकामी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बांगलादेशात रविवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून कर्फ्यू लागू करण्यात आला होता. मात्र, सोमवारी हिंसक आंदोलकांनी कर्फ्यु झुगारुन शेख हसीना यांच्या घराला घेराव घातला. एवढंच नाही तर, कर्फ्यू दरम्यानच शेरपूर कारागृहात हल्लेखोर लाठ्या घेऊन घुसले आणि जवळपास ५०० कैद्यांना कारागृहातून बाहेर काढलं. त्यामुळे भारतीय लष्करही अलर्ट मोडवर आहे.