23.2 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeअंतरराष्ट्रीयशेख हसीनांसाठी ब्रिटनची दारे बंद!

शेख हसीनांसाठी ब्रिटनची दारे बंद!

लंडन : वृत्तसंस्था
बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या देशव्यापी हिंसक आंदोलनानंतर सरकार कोसळलं आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतात आश्रय घेतला होता. त्यानंतर दुस-याच दिवशी शेख हसीना या ब्रिटनला जाणार असल्याची माहिती पुढे आली होती. त्यासाठीच्या हालचाली देखील सुरु झाल्या होत्या. मात्र आता शेख हसीना पुढील काही दिवस भारताबाहेर जाण्याची शक्यता नसल्याचे समोर आलं आहे. कारण त्यांच्या ब्रिटन दौ-यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. ब्रिटनने हसीना यांना नियमावली दाखवत आश्रय देण्यास नकार दिला आहे.

शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि भारतात आल्या. त्यानंतर हसीना यांना त्यांची बहीण आणि मुलगा राहत असलेल्या ब्रिटनमध्ये आश्रय घ्यायचा असल्याचे म्हटलं जात होतं. मात्र आता ब्रिटनमधून आश्रयाची आशा बाळगणा-या शेख हसीना यांना धक्का बसला आहे. ब्रिटनने आमचे इमिग्रेशनचे नियम कोणत्याही व्यक्तीला आश्रयासाठी येण्यास किंवा तात्पुरते राहण्याची परवानगी देत ​​नाहीत, असं म्हटलं आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या गृहमंत्रालयाने ज्या देशात तुम्ही आधी सुरक्षितपणे पोहोचला होतात तिथेच आश्रय घ्या, असेही सांगितले होते. त्यामुळे शेख हसीना या भारतातच थांबल्या असल्याचे म्हटलं जात आहे.

पंतप्रधान पद सोडल्यानंतर शेख हसीना या ढाकातून लष्करी हेलिकॉप्टरने भारतात आल्या. तूर्त ब्रिटनकडून मंजुरी न मिळाल्याने शेख हसीना त्यांची बहीण शेख रेहानासोबत भारतात आहेत. भारत सरकारने हसीना यांना त्यांच्या भविष्यातील योजना सांगण्यास सांगितले आहे. हसीना येथे जास्त काळ राहू शकत नाही, असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे ब्रिटनने इमिग्रेशनच्या नियमांचे कारण देत शेख हसीना यांना भारतात आश्रय घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता शेख हसीना यांना आता नव्या पर्यायाचा विचार करावा लागेल. ब्रिटन गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटलं की, गरजू लोकांना सुरक्षा प्रदान करण्याचा आमचा रेकॉर्ड चांगला आहे. पण आमच्या इमिग्रेशन नियमांमध्ये कोणीही आश्रय किंवा तात्पुरता आश्रय मिळवण्यासाठी यूकेमध्ये जाण्याची तरतूद नाही. ज्या लोकांना आंतरराष्ट्रीय संरक्षणाची गरज आहे त्यांनी प्रथम त्याच देशात आश्रयासाठी अर्ज केला पाहिजे जिथे त्यांनी आपला देश सोडला. शेख हसीना यांनी ब्रिटनकडे आश्रय मागितला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR