लातूर : प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि देशभरात चांगले यश मिळवल्यानंतर काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. या अनुषंगाने पक्षाच्या वतीने विभागवार आढावा बैठका घेऊन २० ऑगस्ट रोजी मुंबई येथे विधानसभा निवडणुक प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यातील पहिली विभागीय आढाव बैठक १० ऑगस्ट रोजी लातूर येथे होत असून या निमित्ताने मराठवाड्यातील विजय मिळवीलेल्या काँग्रेसच्या तिन्ही खासदारांचा जाहीर सत्कारही करण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रात १३ खासदार निवडून आले असून एका अपक्ष खासदारांने पक्षाला पाठींबा दिला आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस पक्ष राज्यात क्रमांक एकवर रहावा, असे प्रयत्न पक्षाचे नेते मंडळींनी सुरु केले आहेत. यानिमित्ताने १० ऑगस्टपासून राज्यात पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली विभागवार बैठका घेऊन प्रत्येक जिल्हयातील निवडणुक पुर्वतयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. यामधील पहिली आढावा बैठक १० ऑगस्ट रोजी लातूर येथे होणार असून याच दिवशी लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण, जालना येथील खासदार डॉ. कल्याण काळे यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे. लातूर येथे होणारी आढावा बैठक आणि जाहीर सत्कार कार्यक्रमास राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषद गटनेते सतेज पाटील, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज देशमुख यांच्यासह लातुर, धाराशिव, बीड जिल्हा पदाधिकारी, नेते उपस्थित राहणार आहेत.
दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हॉटेल ग्रँड येथे मान्यवर नेत्यांची पत्रकार परिषद होईल. सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे पक्षाच्या मराठवाड्यातील नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार समारंभ होइल. त्यानंतर दुपारी २ वाजता हॉटेल ग्रँड या ठिकाणी लातुर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील पदाधिका-यांकडून निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे व शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड. किरण जाधव यांनी दिली आहे.