नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी बांगलादेशमध्ये घडत असलेल्या घडामोडींवरून एक वादग्रस्त विधान केलं आहे. जे बांगलादेशमध्ये घडत आहे, ते भारतातही घडू शकतं, असा दावा सलमान खुर्शिद यांनी केला. भारतामध्ये वरवर पाहता परिस्थिती सामान्य दिसत असली तरी बांगलादेशप्रमाणे सरकारविरोधात हिंसक आंदोलन होऊ शकते, असेही सलमान खुर्शिद यांनी म्हटलं आहे.
एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये बोलताना काँग्रेस नेते सलमान खुर्शिद म्हणाले की, काश्मीरमध्ये सर्वकाही आलबेल आहे, असं वाटू शकतं. आपण विजयाचा आनंद साजरा करत आहोत. मात्र २०२४ मधील विजय किंवा यश हे अगदीच किरकोळ असेल, अजून बरंच काही करणं बाकी आहे. आपल्या देशामध्ये जो प्रसार होत आहे, तो बांगलादेशप्रमाणे घडणा-या गोष्टींना पसरण्यापासून रोखत आहे.
सलमान खुर्शिद यांनी पुढे सांगितलं की, दक्षिण पूर्व दिल्लीमधील शाहीनबाग येथे महिलांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले सीएए-एनआरसी विरोधातील आंदोलन जवळपास १०० दिवस चाललं, त्या आंदोलनाने देशाला अशा प्रकारचं आंदोलन करण्याची प्रेरणा दिली. मात्र हे एक अयशस्वी आंदोलन ठरले, कारण यामध्ये सहभागी होणारे अनेकजण अद्याप तुरुंगात आहेत. आज देशामध्ये शाहीनबागसारखं दुसरं आंदोलन होऊ शकत नाही.
मी शाहीनबाग आंदोलन अयशस्वी झालं, असं म्हटल्यास तुम्हाला वाईट वाटेल? आपल्यापैकी अनेकजण शाहीन बाग आंदोलन यशस्वी झालं, असं मानतात. मात्र शाहिनबागशी संबंधित लोकांसोबत काय घडतंय हे मला माहिती आहे. त्यामधील किती लोक अद्याप तुरुंगात आहेत? त्यामधील कितीजणांना जामीन मिळत नाही? यामधील किती लोकांनी देशाचं शत्रू ठरवण्यात आलं आहे, हे मला माहिती आहे, असेही ते म्हणाले.