मुंबई : प्रतिनिधी
प्रभादेवी येथे फुटपाथवर लावलेल्या बोर्डावरील धनुष्यबाणाचे चिन्ह उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिका-यांनी काढल्याचा आरोप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावरून उबाठा आणि शिंदे गट आमने-सामने आल्यानंतर जोरदार राडा झाला. याप्रसंगी शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे दिसून आले. याबाबत शिंदे गटाचे माहीम विधानसभा प्रमुख कुणाल वाडेकर यांनी पोलिसांत यापूर्वी तक्रारसुद्धा केली होती.
प्रभादेवी, रवींद्र नाट्य मंदिराशेजारील फुटपाथवर लावण्यात आलेल्या होर्डिंगवरील धनुष्यबाण हे चिन्ह मंगळवारी रात्री उबाठा गटाच्या पदाधिका-यांनी काढले. यावरून शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले. यानंतर दोन्ही गटांचे पदाधिकारी आमने-सामने आल्यानंतर दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात राडा झाला.
फुटपाथवर लावण्यात आलेला हा बोर्ड शिंदे गटाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्या स्वखर्चातून लावण्यात आल्याचा दावा शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी केला. होर्डिंगवरील धनुष्यबाणाचे चिन्ह कापून तिथून पळ काढताना एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी ठाकरे गटाच्या पदाधिका-यांना रंगेहाथ पकडल्याने हा वाद चिघळला गेला, अशी माहिती सूत्रांनी दिली.