कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूरातील विशाळगडावर ‘कंदीलपुष्प’वर्गातील नवीन प्रजाती सापडली आहे. या नवीन प्रजातीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. या अनोख्या पद्धतीने संशोधकांनी महाराजांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली आहे.
कोल्हापूर शहारातील अक्षय जंगम, रतन मोरे, डॉ. निलेश पवार तसेच नाशिक मधील चांदवड इथले डॉ. शरद कांबळे आणि शिवाजी विद्यापीठामधील प्रा. डॉ. एस. आर. यादव यांच्या चमूने विशाळगडावर ‘कंदील पुष्प’वर्गातील नवीन प्रजाती शोधली आहे.
नवीन प्रजातीचे सेरोपेजिया ‘शिवरायीना’ असे नामकरण करून शिवाजी महाराजांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. या संदर्भातील शोधनिबंध न्यूझीलंडमध्ये प्रकाशित होणा-या ‘फायटोटॅक्सा’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात झाला आहे. अक्षय जंगम व डॉ. निलेश पवार गेली सहा वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ल्यावरील वनस्पतींचा अभ्यास करत आहेत. त्याअंतर्गत काम चालू असताना ऑगस्ट २०२३ मध्ये विशाळगडावर कंदीलपुष्प वर्गातील एक वेगळी वनस्पती आढळली.