परभणी : परभणी जिल्ह्यात चारा, पाणी मुबलक प्रमाणात आहे. परंतु पाहीजे त्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय सुरु नव्हता. परंतु आता मागील काही वर्षापासून दुग्ध व्यवसायात वाढ होत आहे ही निश्चीत चांगली बाब आहे. जिल्ह्यातील धवल क्रांतीचे स्वप्न आता पूर्ण होण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच जिल्ह्यातील दूध संकलन प्रतिदिन १ लक्ष लिटर करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून या माध्यमातून शेतक-यांना जोडधंदा उभा करुन देत आर्थिक सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असे प्रतिपादन आ. डॉ. राहुल पाटील यांनी केले.
साबर डेअरी अंतर्गत किसान कृपा दूध शीतकरण केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या पशूसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. ७ रोजी परभणी मेडीकल कॉलेज ऍन्ड आर. पी. हॉस्पिटल परिसरात दूध उत्पादक शेतक-यांचा महामेळावा पार पडला. यावेळी आ. डॉ. पाटील बोलत होते. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना आ. डॉ. पाटील म्हणाले, परभणी मतदार संघात बंधारे, छोटे तलाव, शेततळे यामाध्यमातून पाणी उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे चारा, पाण्याची समस्या सुटली आहे. शेतकरी व त्यांच्या कुटूंबाने या चा-याचा उपयोग करुन दुग्धव्यवसाय सुरु केला आहे.
सध्या मानवत येथे २५ हजार लिटर दुधाचे संकलन होत आहे. लवकरच हा आकडा १ लाखावर जाणार आहे. शेतक-यांना अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध करुण देण्याासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार आहे. म्हशीचे दूध पश्चिम महाराष्ट्रात ज्या प्रमाणे धवलक्रांती झाली आहे. त्याहून अधिक प्रमाणात परभणी जिल्ह्यात दुग्धव्यवसाय वाढला पाहीजे यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. गाईच्या दुधाला जसे अनुदान दिले जाते त्याच पध्दतीने म्हशीच्या दुधाला ५ रू. प्रती लिटर रुपयाचे अनुदान द्यावे अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे आ. पाटील म्हणाले.
यावेळी कुलगुरु डॉ. इंद्र मणि म्हणाले, परभणीसारख्या भागात धवलक्रांतीची सुरुवात सुखावह बाब आहे. त्यामुळे आगामी काळात परभणी जिल्हा दुधाच्या बाबतीत संपन्न होणार यात शंका नाही. दुग्ध व्यवसायीकांना विद्यापीठाच्यावतीने योग्य ते मार्गदर्शन दिले जाईल असे कुलगुरुंनी सांगितले.
या महामेळाव्यात यशस्वी दूग्ध व्यवसायाची पंचसूत्री, उच्च वंशावळीच्या कालवडीची पैदास व संगोपन, सेक्ससिमेनची उपलब्धता व वापर, पशूविमा, पशूधन खरेदीसाठी बँकांद्वारे सुलभ हफ्त्यात कर्ज पुरवठा या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. शासकीय पशूवैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय, जिल्हा दूग्ध व्यवसाय विकास अधिकारी एस.व्ही. गिणगिणे, पशूसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. पी.पी. नेमाडे, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेवराव आघाव, डेअरी विभागाचे दुध संकलन पर्यवेक्षक उमेश गुंडूरे, उपविभागीय कृषि अधिकारी रवि हरणे व एल.डी. एम. लीड बँकेचे व्यवस्थापक उदय कुलकर्णी, पशू विमा प्रतिनिधी अभय जोशी, अमूल पशू खाद्यचे व्यवस्थापक अमित भोसले, भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक दिवाकर राव व एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक निलेश भावसार उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रगतशील उत्पादकांचा सन्मान करण्यात आला. या मेळाव्यासाठी किसान कृपा दूध संकलन आणि शीतकरण केंद्र (ता. मानवत) चे संचालक भूषण चांडक, झिंकल पटेल, पोपट देसाई, वैभव बारहाते, के.पी. सिंग व दुष्यंत कुमार यांनी परिश्रम घेतले.