19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeअंतरराष्ट्रीयबांगला देशातील आंदोलन हायजॅक; २० अवामी नेते ठार!

बांगला देशातील आंदोलन हायजॅक; २० अवामी नेते ठार!

नाशिकचा कांदा सीमेवर अडकला भारत-बांगलादेश विमानसेवा रद्द भारताच्या वस्त्रोद्योगावर परिणाम बिहार-नेपाळ सीमेवर हाय अलर्ट

ढाक्का : वृत्तसंस्था
बांगलादेशमधून आणखी एक धक्कादायक बातमी येत आहे. विद्यार्थ्यांनी सुरु केलेले आंदोलन आता आणखी हिंसक बनू लागले असून विद्यार्थी नेत्यांनी सुरू केलेले आंदोलन हायजॅक होऊ लागले आहे. सत्ताधारी अवामी लीगच्या नेत्यांवर हल्ले केले जात असून देशभरातून अवामी लीगच्या २० नेत्यांचे मृतदेह सापडले आहेत.

अवामी लीगच्या अनेक नेत्यांच्या घरांवर आणि उद्योग धंद्यांवर हल्ले केले जात असून लुटालुट सुरु आहे. यामुळे अवामी लीगच्या नेत्यांमध्ये पळापळ सुरु झाली. दोन मंत्र्यांना विमानतळावरून देश सोडण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेण्यात आले.

२४ जणांना जीवंत जाळले : दरम्यान, बांगलादेशचा प्रसिद्ध गायक राहुल आनंद यांचे ढाक्यातील धानमंडी भागातील १४० वर्षे जुने घर दंगेखोरांनी जाळले. प्रसिद्ध अभिनेता शांतो खान आणि त्याच्या वडिलांना जमावाने बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली. अवामी लीगचे नेते शाहीन चक्कलदर यांच्या मालकीच्या जाबीर इंटरनॅशनल हॉटेलला आग लावली. या हॉटेलमध्ये एका इंडोनेशियन नागरिकासह किमान २४ जणांना जमावाने जिवंत जाळले.

नाशिकचा कांदा सीमेवर : बांगलादेश भारताकडून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करीत असल्याने या घडामोडीने दोन्ही देशांचे नुकसान होत आहे. नाशिकमधून दररोज ६० ते ७० ट्रक कांदा दररोज बांगलादेशला रवाना होतो. एका ट्रकमध्ये ३० टन कांदा भरला जातो. मात्र, बांगलादेशकडे रवाना झालेले कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर अडकून पडले आहेत. हा कांदा कमी भावात कोलकात्यातच विकण्याची आफत ओढवू शकते. नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष आणि कांद्याची मोठ्या प्रमाणात बांगलादेशात निर्यात केली जाते.

बिहारमध्ये अलर्ट जारी : बिहारच्या अनेक भागांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय निमलष्करी दलांसह पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याची सीमा नेपाळशी जोडलेली आहे, ज्याचा वापर इतर देशांतील घुसखोर भारतात प्रवेश करण्यासाठी करतात, असे पोलिसांनी सांगितले. तसेच सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) बांगला देशातील बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ४,०९६ किमी लांबीच्या भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर राहणा-या लोकांना सीमावर्ती भागात, विशेषत: रात्रीच्या वेळी अनावश्यक जाऊ नका, असे आवाहन केले आहे.

बांगलादेशात जाणारी विमाने रद्द : एअर इंडिया, इंडिगोसह भारतातील काही प्रमुख कंपन्यांनी बांगलादेशासाठीची विमानसेवा तातडीने स्थगित केली आहे. प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाची असून, विमानसेवा स्थगित केल्याचे विमान कंपन्यांनी सांगितले.

भारताच्या वस्त्रोद्योगावर परिणाम : बांगलादेशातील राजकीय संकट भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी चिंतेचा विषय झाला आहे. येथील कोणत्याही पुरवठ्यात व्यत्यय आल्यास त्याचा पुरवठा साखळीवर तत्काळ परिणाम होईल, त्यामुळे भारतीय कंपन्यांच्या उत्पादनावर आणि पुरवठ्यावर परिणाम होईल, असे भारतीय कापड उद्योग परिसंघाने (सिटी) म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR