कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका संपली असून श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ विकेटवर २४८ धावा केल्या होत्या. भारतापुढे विजयासाठी २४९ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, पहिल्या दोन मॅचप्रमाणे तिस-या वनडेमध्ये भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांपुढं संघर्ष करताना पाहायला मिळाले. भारतीय संघ १३८ धावांवर बाद झाल्याने श्रीलंकेनं तब्बल ११० धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेपुढे भारतीय संघाने तब्बल २७ वर्षांनी एकदिवसीय सामन्यांची मालिका गमावली आहे.
भारतीय संघ तिस-या वनडेमध्ये पराभूत झाला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, रियान पराग आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी डावाची चांगली सुरुवात करुन देखील ते मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. शुभमन गिल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, शिवम बे, कुलदीप यादव यांना १० धावांचा टप्पा देखील ओलांडता आला नाही. अखेर श्रीलंकेने तिस-या मॅचमध्ये भारताचा ११० धावांनी पराभव केला.
रोहित शर्माने आज ३५ धावा केल्या. विराट कोहली २०, रियान पराग १५ तर वॉशिंग्टन सुंदरने ३० धावा केल्या. भारताचे इतर फलंदाज दोन अंकी धावसंख्या देखील करु शकले नाहीत. त्यामुळे भारताला ११० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. श्रीलंकेकडून दुनिथ वेल्लालगेने ५ विकेट घेत भारताच्या टीमचे कंबरडे मोडले. श्रीलंकेच्या फिरकीपुढे भारताच्या फलंदाजांना अपयश आले. भारताने तब्बल २७ वर्षानंतर श्रीलंकेविरुद्ध मालिका गमावली आहे. १९९७ नंतर पहिल्यांदा श्रीलंकेने भारताविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली मॅच टाय झाली. यानंतर दुस-या मॅचमध्ये श्रीलंकेने भारताला ३२ धावांनी पराभूत केले. तर, तिस-या मॅचमध्ये भारताचा ११० धावांनी पराभव झाला.
भारताचे फलंदाज तिन्ही सामन्यात श्रीलंकेच्या फिरकीपटूंसमोर संघर्ष करताना पाहायला मिळाले. भारताचा संघ तिन्ही सामन्यात बाद झाला. श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी भारताच्या २७ विकेट घेतल्या. वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालगे, चारिथ असलंका आणि जेफरी वेंडरसे यांनी भारताच्या फलंदाजीला सुरुंग लावला. श्रीलंकेने सनथ जयसूर्याच्या मार्गदर्शनात ही पहिला मालिका जिंकली आहे. भारताने यापूर्वी १९९७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध मालिका गमावली होती. त्या मालिकेत सनथ जयसूर्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार देण्यात आला होता.