30.9 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeलातूरविद्यार्थ्यांच्या जबाबाचे पोलिसांकडून अवलोकन

विद्यार्थ्यांच्या जबाबाचे पोलिसांकडून अवलोकन

लातूर : प्रतिनिधी
जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा (जेएसपीएम) संचलित येथील जुन्या एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात इयत्ता ७ वी वर्गात शिक्षण घेत असलेल्या अरविंद खोपे य १३ वर्षीय मुलाचा संस्थेच्या वसतिगृहात संशयास्पद मृत्यू प्रकरणात न्यायालयात पोलिसांनी पोलिस कोठडीच्या अहवालात विद्यार्थ्यांच्या जबाबाच्या अवलोकनातून ताब्यात असलेल्या आरोपींनीच मरणाची अपप्रेरणा दिल्यानेच अरविंदने गळफास घेतल्याचे निष्पन्न झाल्याचे नमूद केले आहे. यावरून १ ऑगस्ट रोजीच बीएनएस १०७ कलमाची गुन्ह्यात वाढ केल्याचेही न्यायालयाला सांगितले आहे.

माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर अध्यक्ष असलेल्या जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा (जेएसपीएम) संचलित येथील जुन्या एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात अरविंद खोपे या अल्पवयीन मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, दि. २९ जुलैच्या रात्री घडली होती. या प्रकरणाचा तपास करणा-या एमआयडीसी पोलिसांना न्यायालयाने चपराक दिल्यांतर सदरील गुन्ह्यात अ‍ॅट्रॉसिटीचे कलम वाढ करण्यात आले व या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे यांच्याकडे वर्ग करण्यात आला. त्यांनी मंगळवारी या प्रकरणी पोलिस कोठडीत असलेला वसतिगृह व्यवस्थापक विठ्ठल सूर्यवंशी व विनायक टेकाळे यास जिल्हा सत्र न्यायालयापुढे हजर करत आरोपींच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली.

या वेळी त्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात सहायक तपास अधिकारी मोरे यांनी विद्यार्थ्यांचे घेतलेल्या जबाबाचे अवलोकन केले असता विद्यार्थ्यानी यातील अटक आरोपी क्रमांक १ यांनी मयत बालकास ‘तू कशाला आलास गावाकडून? सारख पोट दुखलं म्हणून आजारी पडतोस. मर जा, गावाकडे शिक तसेच आरोपी क्रमांक २ यांनी मयतास तुझं पोट दुखणं बंद झाल का की नाटक करतोस? तुला शिकायचं नसल्यास जा मर गावाकडं. इथं आम्हाला दिसू नको, असे म्हणून मयत बालक अरविंद राजेभाऊ खोपे यास अपप्रेरणा दिल्यामुळे मयत बालकाने गळफास घेतला आहे, असे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने बीएनएस कलम १०७ हे सदर गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आली आहे. त्या बाबतची तशी नोंद दि. ०१ऑगस्ट २०२४ रोजी स्टे. क्रमांक ०६ वेळ ००:५८ वा. घेण्यात आली असल्याचे नमूद केले आहे.

पोलिस राजकीय दबावाखाली असल्याचा दुस-या दिवशीही सूर
मयत अरविंद खोपेच्या समाजबांधवानी सुरू केलेल्या ३ दिवसीय धरणे आंदोलनात पोलिस राजकीय दबावात तपास करीत असल्याचा सूर दुस-या दिवशीही कायम होता. तसा आरोप करत या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली. लातूरकरांत नेमकं या प्रकरणात काय सुरू आहे व सत्यता काय आहे, याचीच चर्चा सुरू आहे.

पोलिसांना शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त
अरविंदच्या प्रेताचे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्याचा आरोग्य विभागाकडून अहवाल पोलिस प्रशासनास प्राप्त झाला असून सदरील शवविच्छेदन अहवालाची प्रत आम्हास मिळावी, अशी अरविंदच्या नातलगांची व त्याच्या वकिलांची मागणी असून पोलिसांकडून त्यांना आज अरविंदच्या शवविच्छेदनाचा अहवाल मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR