मुंबई : दादर रेल्वे स्थानकात सुटकेसमध्ये मिळालेल्या मृतदेहाप्रकरणी मयत अर्शदअली शेख याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली. पत्नी रुक्सानाचा हत्येत सहभाग आढळल्याने पायधुणी पोलिसांनी ही कारवाई केली. रुक्साना हिच्या पतीचा मित्र आणि आरोपी जय चावडा याच्यासोबत तिचे विवाहबा संबंध होते आणि त्यातूनच हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
दरम्यान, मुंबईतल्या दादर स्थानकामध्ये रविवारी रात्री कोकणात जाणा-या तुतारी एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात मोठी सुटकेस चढवण्याचा प्रयत्न एक तरुण करत होता. राज्य रेल्वे पोलिस दलाचे अंमलदार माधव केंद्रे आणि रेल्वे सुरक्षा बलाचे जवान संतोषकुमार यादव यांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना सुटकेसवर रक्ताचे डाग आढळले.
पोलिसांनी तरुणास सुटकेस उघडण्यास सांगितले, तेव्हा त्याने नकार दिला. त्यामुळे पोलिसांनीच ती सुटकेस उघडून पाहिली असता त्यात रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. त्यानंतर दादर रेल्वे पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. त्याचे नाव जय चावडा असून मृत व्यक्तीचे नाव अर्शद शेख असल्याचे समजते.
पायधुनी येथे जय चावडा याने अर्शद याला दारू पिण्यासाठी बोलावून मित्र शिवजीत सिंग याच्या मदतीने त्याची हत्या केली, हातोड्याने क्रूरपणे ठार मारल्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून तुतारी एक्स्प्रेसने जाण्याच्या प्रयत्नात असताना जय याला दादर रेल्वे स्थानकावर पकडण्यात आले. त्यानंतर उल्हासनगर येथून शिवजीत याला अटक करण्यात आली.
हत्येची घटना झाली तेव्हा बेल्जियमचा नंबर असलेल्या एका अनोळखी व्यक्तीला व्हीडीओ कॉल करण्यात आला होता. ही व्यक्ती कोण आणि त्यांचा या सगळ्यांशी काय संबंध, पोलिस शोध घेत आहेत.
दरम्यान, आरोपी जय याने चौकशीत सांगितले की, जय, अर्शद आणि शिवजीत सिंग हे मित्र असून तिघेही मूकबधिर आहेत. जय पायधुनी परिसरात राहतो. रविवारी तिघे त्याच्या घरी एकत्र होते. तेथे त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर जय आणि शिवजीत यांनी अर्शदच्या डोक्यात हातोडा घातला. त्यानंतर त्याच्या शरीरावर धारदार हत्यारांनी अनेक वार केले. ही हत्या पायधुनी पोलिस ठाण्यात घडली असल्याने रेल्वे पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सोमवारी सकाळी पायधुनी पोलिस ठाण्यात वर्ग केला. पायधुनी पोलिसांनी शिवजीतला उल्हासनगर येथून अटक केली.