25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeसोलापूरदोन लाखांच्या लाचप्रकरणी मंडल अधिकारी, तलाठ्यावर गुन्हा दाखल

दोन लाखांच्या लाचप्रकरणी मंडल अधिकारी, तलाठ्यावर गुन्हा दाखल

सोलापूर – बंद झालेला जागेचा उतारा सुरु करून घेण्यासाठी ६ लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ४ लाख रुपये लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून २ लाख रूपये स्विकारण्यास संमती देणाऱ्या मंडल अधिकारी व तलाठ्याविरुध्द जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर तहसिल कार्यालयातील मंडल अधिकारी संदीप भिमराव लटके आणि नेहरू नगर चे तलाठी पवनकुमार मोहनराव चव्हाण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील तक्रारदार हे कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या कंपनीच्या मालकीची शहरातील नेहरू नगर येथे ८६.६७ आर खुली जागा आहे. महसुल प्रशासनात झालेल्या संगणकीकरणामुळे त्या जागेचा ७/१२ उतारा बंद झाला होता. तो उतारा पुन्हा चालू करण्यासाठी तक्रारदाराने उत्तर तहसिल कार्यालय येथे अर्ज दिला होता.

हा उतारा पुन्हा चालू करण्याच्या अनुषंगाने महसुल अधिनियम कलम १५५ नुसार तक्रारदारने उत्तर सोलापूर तहसिल कार्यालय येथे प्रस्ताव सादर करण्यासाठी मंडल अधिकारी संदीप लटके व तलाठी पवनकुमार चव्हाण यांनी तक्रारदाराकडे ६ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ४ लाख रुपये देण्याचे ठरले होते.दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती.

तक्रारीची खातरजमा करून मंडल अधिकारी लटके व तलाठी चव्हाण यांनी लाचेच्या रकमेपैकी २ लाख रुपयांचा पहिला हप्ता स्विकारण्यास संमती दिली असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई उपअधिक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडीक, हवालदार शिरीषकुमार सोनवणे, अतुल घाडगे, सलिम मुल्ला, स्वामीराव जाधव यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR