पॅरिस : भारत सुवर्ण पदकाचा दुष्काळ संपवेल अशी तमाम भारतीयांना आशा होती. पण, जर्मनीने तमाम भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा करत अंतिम फेरी गाठली. भारताच्या हॉकी संघाला जर्मनीने उपांत्य फेरीत पराभूत करून सुवर्ण पदकाच्या शर्यतीतून बाहेर फेकले. तर स्पेनला नेदरलँड्सकडून उपांत्य सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे कांस्य पदकासाठी गुरुवारी भारत आणि स्पेन यांच्यात लढत झाली.
सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्हीही संघांनी बचावात्मक खेळ करण्यावर भर दिला. संधी मिळताच भारतीय शिलेदार आक्रमक खेळ करताना दिसले. पण, पहिल्या क्वार्टरमध्ये कोणत्याच संघाने म्हणावी तशी जोखीम घेतली नाही. त्यामुळे पहिली १५ मिनिटे कोणत्याच संघाचे नुकसान आणि फायदाही झाला नाही. पहिल्या क्वार्टरमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही. खरे तर भारताचा गोलरक्षक पीआर श्रीजेशने त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला.
मागील अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्य पदक जिंकले होते. त्यामुळे भारतीय शिलेदारांवर पदकाचा बचाव करण्याची मोठी जबाबदारी होती. कांस्य पदकाच्या लढतीतील दुस-या क्वार्टरमधील तिस-या मिनिटाला स्पेनने पेनल्टी कॉर्टरच्या रूपात पहिला गोल केला. यासह त्यांनी १-० अशी आघाडी घेतली. पिछाडीवर जाताच भारतीय संघावरचा दबाव वाढला. पाचव्या मिनिटाच्या अखेरीसही स्पेनला पेनल्टी कॉर्नरच्या रूपात गोल करण्याची संधी मिळाली. मात्र यावेळी भारताला बचाव करण्यात यश आले. या क्वार्टरमधील १३ व्या मिनिटालाही स्पेनला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला पण भारताने या कठीण काळाचे संधीत रूपांतर करताना चेंडू स्पेनच्या खेळाडूंपासून दूर नेला. इथेच भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण गोल करण्यात टीम इंडियाला अपयश आले. अखेरच्या मिनिटाला भारताला आणखी एक पीसी मिळाली. यावेळी मात्र भारताने गोल करून १-१ अशी बरोबरी साधली.
भारताचा पहिला गोल
पुरेशी विश्रांती आणि रणनीती ठरवून दोन्ही संघांनी तिस-या क्वार्टरची सुरुवात केली. या क्वार्टरच्या तिस-याच मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि भारताने आणखी एक गोल करून २-१ अशी आघाडी घेतली. चौथ्या मिनिटाला पुन्हा एकदा भारताला गोल करण्याची आयती संधी चालून आली. पण, यावेळी पेनल्टी कॉर्नरचा फायदा भारताला झाला नाही. इथे अभिषेकला पंचानी कार्ड दाखवल्याने त्याला २ मिनिटे बाकावर बसावे लागले. या क्वार्टरच्या अखेरपर्यंत स्पेनच्या खेळाडूंनी अनेकदा आक्रमक खेळ केला. पण, त्यांना गोल करता आला नाही.
दुसरा गोल
चौथा अर्थात अखेरचा क्वार्टर पदक मिळवून देणारा होता. भारताकडे आघाडी कायम होती, स्पेनच्या खेळाडूंकडे बरोबरी साधण्यासाठी जोखीम घेण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता. याच मार्गाने जात स्पेनने आक्रमक खेळ केला. चौदाव्या मिनिटाला स्पेनला पेनल्टी कॉर्नरच्या रूपात सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. पण, त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही. शेवटच्या मिनिटाला स्पेनला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. भारतीय खेळाडूच्या पायाला चेंडू लागल्याने त्यांना आणखी एक पीसी मिळाली. पण त्यांची खराब कामगिरी कायमच राहिली. अखेरच्या क्वार्टरच्या शेवटपर्यंत स्पेनचा संघ संघर्षच करत राहिला. पहिला गोल करून आघाडी घेऊनही त्यांना विजय साकारता आला नाही. सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत स्पेनचे खेळाडू गोल करण्यासाठी तरसले. भारताने अखेरपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली आणि २-१ ने सामना आपल्या नावावर केला. यासह भारताने सलग दुस-यांदा कांस्य पदक जिंकले.